सिगारेटच्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून मालकावर वार ; दांडेकर पुलावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:55 PM2021-05-03T20:55:49+5:302021-05-03T20:56:16+5:30
दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
पुणे : सिगारेट आणून न दिल्याने सराईत गुन्हेगाराने कामगारांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मालकावर दोघा सराईत गुन्हेगारांनी कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केला. ही घटना दांडेकर पुलाजवळील सार्वजनिक शौचालयासमोर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
याप्रकरणी ओम सुरवसे (वय २१) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जितेंद्र कदम, अनिल कदम, मयुर कदम, आकाश ऊर्फ गिरी पोपट सोनवणे (सर्व रा. दांडेकर पुल) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ओम सुरवसे यांचा घोड्यांचा व्यवसाय आहे. सारसबागेजवळ मुलांना घोड्यांना बसवून व्यवसाय केला जातो. त्यांच्याकडे दोन कामगार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कामगारांनी सिगारेट आणून न दिल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्याचा जाब सुरवसे यांनी विचारला होता. त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली होती.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता ओम हे शौचालयात जात असताना दोघांनी अडविले. याला आज जिवंत सोडायचा नाही, असे म्हणून शिवीगाळ करीत कोयत्याने वार केला. आजूबाजूला जमलेल्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी लोकांना सुटा येथूऩ आमच्या नादी लागला तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे नागरिक पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पवार अधिक तपास करीत आहेत.