नानगावला यात्रेत पोलिसांवरच हल्ला

By admin | Published: April 6, 2015 05:31 AM2015-04-06T05:31:22+5:302015-04-06T05:31:22+5:30

: नानगाव (ता.दौंड) येथील ग्रामदैवत श्री रासाईदेवी यात्रेच्या वेळी तमाशा सुरू असताना, हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही गावगुंडांनी जीवघेणा हल्ला

Attack on police in Nangawal yatra | नानगावला यात्रेत पोलिसांवरच हल्ला

नानगावला यात्रेत पोलिसांवरच हल्ला

Next

यवत : नानगाव (ता.दौंड) येथील ग्रामदैवत श्री रासाईदेवी यात्रेच्या वेळी तमाशा सुरू असताना, हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही गावगुंडांनी जीवघेणा हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले आहे.
पोलीस हवालदार प्रदीप जाधव व पोलीस काँस्टेबल संतोष पंडित गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणत, शिवीगाळ व जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नीलेश गुंड, दीपक खळदकर, शिवाजी खळदकर, दीपक काळे, गोट्या गाढवे (सर्व रा.नानगाव, ता.दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत यवत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नानगाव येथील श्री रासाई देवीची यात्रा काल (दि.४) रोजी होती. यावेळी यात्रेनिमित्त मालती इनामदार यांचा लोकनाट्या तमाशाचा कार्यक्रम रात्री ठेवण्यात आला होता.सदर तमाशाच्या वेळी पोलीस हवालदार प्रदीप जाधव व मारकड यांना बंदोबस्त कामी नेमण्यात आले होते.
तमाशा सुरू झाल्यानंतर समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले नीलेश गुंड, दीपक खळदकर, शिवाजी खळदकर, दीपक काळे, गोट्या गाढवे यांनी आरडाओरडा व गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना पोलिसांनी समजावून सांगूनदेखील त्यांची हुल्लडबाजी सुरूच होती. त्यांना परत समजावून सांगण्यासाठी पोलीस गेले असता त्यांनी पोलिसांनाच दम दिला व बघून घेऊ, असे धमकावले. काही वेळाने पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस कमर्चारी होळकर, कर्पे, पंडित व सुळ बंदोबस्तासाठी तेथे आले. त्यावेळी पोलीस हवालदार जाधव यांनी गोंधळ घालणारे दाखवून दिले. त्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास परत गोंधळ सुरू झाल्यानंतर, पोलिसांनी तमाशा बंद करण्यास सांगितले. मात्र तमाशा बंद करू नका, आमच्या गावाची यात्रा आहे, आम्ही काहीही करू असे सांगत वरील आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस हवालदार जाधव, आरोपी शिवाजी खळदकर याला बाजूला घेऊन समजावून सांगत असताना, आरोपी नीलेश गुंड याने स्टेजसाठी जमिनीत ठोकलेली खुट्टी उपटून डोक्यात मारत असताना, जाधव खाली वाकल्याने ती त्यांच्या उजव्या कानाला लागून गंभीर दुखापत झाली, तर आरोपी दीपक खळदकर याने दुसरी खुट्टी उपटून पोलीस संतोष पंडित यांच्या डोक्यात मारली.
तेथे पोलिसांना शिवीगाळ करून आरोपी गर्दीत पळून गेले. सदर घटनेनंतर दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी भेट दिली.

Web Title: Attack on police in Nangawal yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.