पुणे पोलिसांवर गाझियाबादमध्ये हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:54+5:302021-05-12T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील पोलीस हवालदाराच्या खून प्रकरणातील संशयित महिलेला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गेलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बुधवार पेठेतील पोलीस हवालदाराच्या खून प्रकरणातील संशयित महिलेला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर स्थानिकांनी हल्ला केला असून त्यात पोलिसांच्या गाडीवर दगदफेक करून तिची तोडफोड करण्यात आली. सर्व झाल्यानंतरही पुणे पोलिसांनी हिंमत न हारता संशयित महिलेला ताब्यात घेतले असून हे पथक पुण्याकडे निघाले आहे.
तोडफोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तेथील तरुण पुणे पासिंग असलेल्या गाडीची तोडफोड करीत असल्याचे दिसत आहे. गाझियाबादमधील नंदग्राम येथे सोमवारी हा प्रकार घडला होता. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून गाझियाबाद पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.
गेल्या आठवड्यात ५ मे रोजी बुधवार पेठेत मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण महाजन याने पोलीस हवालदार समीर सय्यद याचा खून केला होता. या प्रकरणातील संशयित महिला प्रवीण महाजनबरोबर होती. तिचा पोलीस शोध घेत होते. ही महिला गाझियाबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व ४ पोलीस सहकारी हे खासगी गाडीने गाझियाबाद येथे गेले होते. हे पोलीस पथक तेथे गेल्यावर स्थानिकांनी त्यांना विरोध करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.
याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, फरासखाना पोलीस ठाण्याचे पथक गाझियाबादला गेले आहे. त्यांच्या गाडीवर स्थानिकांनी दगडफेक केली. मात्र, कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी जखमी झालेले नाही. ज्या कामासाठी ते गेले होते. त्या महिलेला त्यांनी ताब्यात घेतले असून तिला घेऊन ते पुण्याकडे निघाले आहेत. उद्या पुण्यात पोहचतील.