‘जमतारा’त गेलेल्या पुणे पोलिसांच्या जीवावर बेतले; सायबर क्राईमसाठी तरुणांना देण्यात आले प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 02:05 AM2020-01-31T02:05:54+5:302020-01-31T02:06:11+5:30
पुणे पोलिसांचे पथक जमतारामध्ये आरोपींच्या शोधासाठी अनेकदा गेले होते.
- विवेक भुसे
पुणे : सायबर क्राईमचे सर्वांत मोठे केंद्र म्हणून ओळख असलेल्या झारखंडमधील जमतारा जिल्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाला दगडफेकीला सामोरे जावे लागले. तेथे असलेल्या महाराष्ट्रीय पोलीस अधीक्षकांनी मदत पुरविल्याने ते जीवानिशी परत येऊ शकले.
‘जमतारा सबका नंबर आयेगा’ ही वेबसिरीज सध्या गाजत आहे. कोणतेही काम नसल्याने जंगलात झाडाखाली बसून मोबाईलवरुन देशभरातील लोकांना कॉल करुन त्यांची फसवणूक करण्याचा धंदा येथील तरुणांनी सुरु केला. त्यामुळे देशभरातून ओटीपी क्रमांक मिळवून त्यावरुन बँक खात्यातून पैसे काढून घेण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यातून जमतारा हा जिल्हा देशभर बदनाम झाला होता. तेथे जाऊन तपास करुन आरोपींना पकडणेही मुश्किल होते. पुणे पोलिसांचे पथक जमतारामध्ये आरोपींच्या शोधासाठी अनेकदा गेले होते. तेव्हा त्यांना आलेले अनुभव भयानक होते. अशा परिस्थितीत त्यांनी तीन आरोपींना पकडून आणले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी सांगितले की, झारखंडमध्ये अतिशय गरिबी आहे. कोळसा खाणींशिवाय इतर कोणतेही उद्योग नाही़ त्यामुळे तरुणांना रोजगाराचे साधन नाही़ १०वी, ११ वी पास झालेल्या तरुणांना दुसरा उद्योगच नसल्याने काही जण कोळसा चोरुन नेणे नाही तर सायबर क्राईम असे गुन्हे करण्यास प्रवृत्त होत असल्याचे दिसून आले़ आम्ही ज्यांना पकडून आणले होते़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले होते की, आम्हाला ट्रेनिंग दिले गेले होते. त्यानंतर आमच्याकडून सायबर गुन्हे करुन घेऊन त्यातून त्यांनी फी वसूल केली होती़ म्हणजे तेथे सायबर क्राईम कसा करावा, याचे चक्क क्लासेस घेतल जात असावेत, असे दिसून येत होते.
जमताराचे केंद्र प. बंगालच्या सीमेवर
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, जमतारा हे बदनाम झाल्याने झारखंडच्या पोलिसांनी मोठा ड्राईव्ह घेतला होता. त्यांनी देशातील सर्व पोलीस ठाण्यांना एका विशिष्ट पद्धतीने एफआयआर पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन संबंधितांना कळविण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता जमतारा येथील सायबर क्राईमचे सेंटर पश्चिम बंगालच्या सीमेकडे सरकले आहे.