सणसवाडीच्या उपसरपंचावर हल्ला
By admin | Published: April 15, 2016 03:33 AM2016-04-15T03:33:12+5:302016-04-15T03:33:12+5:30
सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक कारखान्यात काम मिळविण्याच्या वादातून उपसरपंच युवराज दरेकर यांच्यावर सणसवाडीतीलच युवकांनी हल्ला करून गाडीची तोडफोड
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक कारखान्यात काम मिळविण्याच्या वादातून उपसरपंच युवराज दरेकर यांच्यावर सणसवाडीतीलच युवकांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली असून, यातील केतन हरगुडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील कारखान्यात काम मिळविण्यावरून उपसरपंच युवराज दरेकर व हल्ला करणाऱ्यांमध्ये काल वाद झाला होता. याच वादातून आज सकाळी युवराज दरेकर हे सकाळी गावात आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम उरकून सणसवाडी चौकामध्ये त्यांच्या आॅडी (एमएच १२-जेक्यू ७७८८) वाहनातून येत असताना चौकात वेगवेगळ्या मोटारसायकलवरून हातात हॉकी स्टिक व दांडकी घेऊन ओलल्या केतन रोहिदास हरगुडे व दप्ीाक साहेबराव दरेकर (दोघेही रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांनी दरेकर यांच्या वाहनाला गाडी आडवी लावून दीपक दरेकर याने दगड घेऊन वाहनाच्या काचेवर मारले, तर केतन हरगुडे याने हातातील हॉकी स्टिकने गाडीवर व युवराज दरेकर यांच्यावर हल्ला करीत असताना दीपक दरेकर यानेही मारण्यास सुरुवात केली. या वेळी केतन व दीपक यांच्याबरोबर असलेल्या इतर तीन ते चार जणांनीही शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारावरून शेजारीच असलेल्या ग्रामस्थांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. केतन हरगुडे याला पकडून ठेवल्याने या हल्ल्यातून युवराज दरेकर बचावले आहेत.
शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सणसवाडी येथे जाऊन केतन हरगुडे याला ताब्यात घेतले असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे पुढील तपास करीत आहेत.