सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:35+5:302021-01-08T04:34:35+5:30
नारायणगाव : नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगन्नाथ घोडेकर (वय ५५) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याने प्राणघातक ...
नारायणगाव : नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगन्नाथ घोडेकर (वय ५५) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.७) दुपारी बाराच्या सुमारास नारायणगाव येथील मोठी वर्दळ असलेल्या कोल्हेमळा चौकात घडली. घोडेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
संग्राम घोडेकर हे कोल्हेमळा येथील मधुकोश सोसायटीत रहात आहेत. दुपारी १२च्या सुमारास ते घरगुती गॅसची टाकी स्कूटीवर घेऊन जात होते. घरापासून काही अंतरावर असलेल्या कोल्हेमळा चौकात आले असताना दुचाकीवरून आलेल्या तीन युवकांनी त्यांना थांबण्याचा इशारा केल्याने ते थांबले. त्याचवेळी दुचाकीवर मागे बसलेल्या दोन युवकांनी घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वर्मी घाव डोक्यात बसल्याने घोडेकर हे खाली कोसळले. काही लोकांनी त्यांना नारायणगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. संग्राम घोडेकर यांची पत्नी रत्ना घोडेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीत स्थानिक एका ज्येष्ठ पुढारी आणि त्यांचा मुलगा यांची नावे दिली असल्याचे समजते.
चौकट
रो हाऊसच्या मालकी हक्क वादातून हल्ला
हा हल्ला रो हाऊसच्या मालकीच्या वादातून झाल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. या घटनेमुळे नारायणगाव परिसरात खळबळ माजली आहे. नारायणगाव पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, पोलिसांना परिसरातून सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून हल्लेखोर हे १७ ते १८ वर्षांचे असावेत, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
फोटो - संग्राम घोडेकर