पीडितेला अॅसिड हल्ल्याची धमकी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 03:04 AM2017-07-25T03:04:08+5:302017-07-25T03:04:08+5:30
अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेल्या पीडित महिलेने आपल्यावर अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची लेखी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेल्या पीडित महिलेने आपल्यावर अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात परिमंडल एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडेही तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बावधन रस्त्यावरील उड्डाणपुलालगतच्या रस्त्यावर घडल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. टिळक यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेतली नाही, तर तोंडावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिला आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल तुजारे सोमवारी सकाळी पीडित महिलेच्या घरामधून बाहेर पडले. मोटारीमधून जात असताना बावधन रस्त्यावर असलेल्या क्रिस्टल होंडा दुकानाजवळील एका पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन ते रस्त्याने जात होते. पीडित महिला स्वत: मोटार चालवित होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांना गाडी आडवी घातली. दोघांपैकी एकाने त्यांना हातामधील बाटली दाखवली. त्यामध्ये पिवळ्या रंगाचे द्रव्य होते. या दोघांनीही हेल्मेट घातलेले होते. मोटारीच्या खिडक्या वाजवून हिंदीमध्ये ‘तुम रोहित तिलक और उसके घरवालोंके खिलाफ की हुई कम्प्लेंट वापीस लेना, वरना बोतल में जो अॅसिड है इसे तेरे मुहपे फेंककर तेरा काम कर देंगे,’ अशी धमकी दिली. त्यानंतर हे दोघेही दुचाकीवर बसून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर माझे फोटो व्हॉट्सअॅपवरून व्हायरल केले असून ओळख समाजासमोर आणली आहे, यासंदर्भात तक्रार केली आहे. सायबर गुन्हे शाखेला चॅटिंगचे स्क्रिनशॉट्स, कॉल रेकॉर्डिंग, व्हाईस रेकॉर्डिंग, धमकीचे व्हिडीओ सादर केल्याचेही या महिलेने सांगितले. विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये महिला अधिकारीच नसल्याने तपास महिला सहायक निरीक्षकाकडे देण्यात आला आहे. मात्र, स्टेटमेंट महिला अधिकाऱ्याने घेणे आवश्यकता असताना तिची फिर्याद पुरुष अधिकाऱ्याने घेतली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी एक महिला म्हणून करावा अथवा अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिका-याकडे द्यावा, अशी मागणी अॅड. तौसिफ शेख यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.