पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:04 PM2022-02-04T21:04:18+5:302022-02-04T21:05:22+5:30
कोयत्याने मारहाण करुन लॅपटॉप, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली
पुणे : रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर सरबत पित असलेल्या तरुणाच्या मोटारसायकलला अडकविलेली लॅपटॉप असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. त्यानंतर त्याला बॅग परत देण्याचा बहाण्याने खंडणी मागितली. तेव्हा या तरुणाने बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला कोयत्याने मारहाण करुन लॅपटॉप, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. हा सर्व प्रकार विमाननगरमधील मंत्री आय टी पार्कच्या गेट शेजारील दुकानासमोर गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला. महादेव सुभाष साठे (वय २१), सोमनाथ संजय कांबळे (वय १९), अनुराग भुजंग ससाणे (वय १९, तिघे रा. यमुनानगर, विमानतळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सिद्धांत चंपालाल चोरडिया (वय ३०, कळसगाव ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरडिया हे गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता एका गाडीवर सरबत पिण्यासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी मोटारसायकलला लॅपटॉपची बॅग अडकवली होती. तिघे जण मोटारसायकलवरुन आले व त्यांनी मोटारसायकलला अडकवलेली बॅग चोरुन नेली. त्यानंतर एक जण त्यांच्या जवळ आला. लॅपटॉपची बॅग हवी असेल तर अडीच हजार रुपये द्यावे लागतील, असे बोलला. त्याला चोरडिया तयार झाले. ते मंत्री आय टी पार्क चे गेटजवळ आले. तेथे चौघांनी लोखंडी कोयता, रॉड, वायर व पाण्याचा कॅन याने फिर्यादी यांना मारहाण करुन जखमी केले. त्याच्याकडून लॅपटॉप व रोकड जबरदस्तीने चोरुन नेला.
शेकडो लोक बनले बघे
सिद्धांत चोरडिया यांनी सांगितले की, म बॅग चोरुन नेल्यानंतर एक जण आला व त्याने बॅग मिळवून देतो, अडीच हजार द्यावे लागतील. तेव्हा मी त्याच्याबरोबर जाऊन अडीच हजार रुपये एटीएममधून काढून आणले. तेथून परत येत असताना एक जण बॅग घेऊन येताना दिसला. त्याला मी बॅग का चोरली. तेव्हा त्याने पैसे मागणार्यानेच बॅग चोरायला सांगितली. त्यानंतर त्यांनी १० हजार रुपयांची मागणी करुन मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे आजू बाजूला शेकडो लोक होते. पण कोणीही पुढे झाले नाही की पोलिसांना फोन केला नाही. तेव्हा ते तेथून पळून गेले.
त्यांनी नातेवाईकांना बोलावून ते पोलिसांकडे गेले.
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले की, मंत्री आय टी पार्कजवळ दुपारच्या वेळी शेकडो जण असतात. पण कोणी पुढे येत नाही. तेथील व्यावसायिकाकडे चौकशी केल्यावर हे गर्ददुले एटीएममधून बाहेर पडणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून २०० - ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पण, कोणीही तक्रार देत नव्हते. काल तक्रार आल्यावर तातडीने शोध घेऊन चौघांपैकी तिघांना अटक केली आहे.
मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न
सिद्धांत चोरडिया यांना चौघे जण मारहाण करत होते. त्यावेळी तेथे असलेल्या एक दोघांनी त्या मारहाणीचा व्हिडिओही काढला असल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले.