Pune crime: येरवडा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
By नितीश गोवंडे | Published: January 27, 2024 03:12 PM2024-01-27T15:12:06+5:302024-01-27T15:13:14+5:30
पोलिस आयुक्तांची ही ९७ वी कारवाई आहे...
पुणे : येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शाहरुख सईद खान (२७, रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) याच्याविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही ९७ वी कारवाई आहे.
शाहरुख खान हा येरवडा पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने लोणीकंद व येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता, यासारख्या हत्यारांसह दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील तीन वर्षात ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी शाहरुख खान याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलिस आयुक्त यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शाहरुख खान याला एमपीडीए कायद्यान्वये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखा, पीसीबी चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.