मुंढवा पोलिसांकडून अट्टल दुचाकी चोर जेरबंद; तब्बल 'इतकी' वाहने केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:35 PM2023-09-14T13:35:18+5:302023-09-14T13:36:09+5:30
सोबतच त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...
- किरण शिंदे
पुणे : मुंढवा पोलिसांनी सापळा रचून दोन चोरट्यांना अटक केली. यातील एक चोरटा अल्पवयीन आहे. या दोघांकडून दुचाकी चोरी आणि घरफोडीचे तब्बल 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्या दोघांच्या ताब्यातून 14 दुचाकी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोरख विलास धांडे (वय 20, रा. शिवशंभू नगर, गोकुळ नगर, कात्रज) असे या चोरट्याचे नाव आहे. सोबतच त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश पाठक वैभव मोरे सचिन पाटील स्वप्निल रासकर यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली होती. तपास पथकातील कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत होते. तपासा दरम्यान पोलीस अमलदार दिनेश भांदुर्गे आणि सचिन पाटील यांना दोन मुले घोरपडी गावात संशयास्पदरित्या फिरत असतात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तपास पथकाच्या कर्मचाऱ्यांनी साकारून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबूल केली. तब्बल 14 दुचाकी रोख रक्कम आणि सोन्याचा दागिने असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून हस्तगत केला आहे.
आरोपींनी पुणे शहरातील मुंढवा, हडपसर, वानवडी, सिंहगड रोड यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील राजगड लोणावळा आणि सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. संबंधित पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल आहेत.