UP तील मनरेगाचा ९२ कोटींचा बनावट धनादेश पुण्यात वटविण्याचा प्रयत्न फसला; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 02:05 PM2021-10-27T14:05:22+5:302021-10-27T14:15:31+5:30
याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
पुणे : उत्तर प्रदेशातील मनरेगा खात्याचा ९२ कोटी ९९ लाख रुपयांचा बनावट धनादेश पुण्यातील एचडीएफसी बँकेत वटविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (National Rural Employment Guarantee Act, 2005 fraud in pune). या प्रकरणी एच डी एफ सी बँकेचे शाखा व्यवस्थापक अश्विन मुकुंद यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उत्कर्ष कन्स्ट्रोवेल कंपनी( वाल्हेकर कॉम्प्लेक्स, नर्हे), प्रताप आण्णाराव पाटील (वय ३६, रा. अस्पायर टॉवर, हडपसर), दत्तात्रय कारमपुरी (रा. सोलापूर) व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर यांनी सांगितले की, उत्कर्ष कन्स्ट्रोवेल ही कंपनी मेट्रो तसेच रस्ते बांधणीचे काम करते. तिचे एच डी एफ सी बँकेत खाते आहे. कंपनीच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लखनौ येथील जवाहर भवन शाखेचा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्लॉयमेंट गॅरंटी अॅक्ट स्कीम (मनरेगा) या खात्याचा धनादेश बनावट सह्या करुन त्यावर ९२ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम लिहिली. हा धनादेश कंपनीने आपल्या खात्यात भरला. एच डी एफ सी बँकेच्या अधिकाऱ्यांना या धनादेशाविषयी संशय आला. त्यांनी या धनादेशाची स्कॅन कॉपी त्यांच्या लखनौ शाखेकडे पाठविली. तेथील एच डी एफ सी बँकेतील अधिकारी स्टेट बँकेत जाऊन या धनादेशाविषयी चौकशी केल्यावर तो बनावट असल्याचे व या खात्यातील सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात. असा धनादेश दिला गेला नसल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर बँकेने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उत्कर्ष कन्स्ट्रोवेल कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांना हा धनादेश प्रताप पाटील व दत्तात्रय कारमपुरी यांनी दिल्याचे कंपनीच्या मालकांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सलगर तपास करीत आहेत.