लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:55+5:302021-08-01T04:11:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळावा यासंदर्भातील शिफारशीचा प्रस्ताव राज्य सरकारने कें ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळावा यासंदर्भातील शिफारशीचा प्रस्ताव राज्य सरकारने कें द्राकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून अण्णा भाऊ साठे यांना हा पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (दि.३१) दिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या रविवारी (दि.१) जयंतीच्या पूर्वसंध्येला राज्य कामगार सुरक्षा दल आणि आर. के. फाउंडेशन यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांचे सहकारी प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित ग्रंथाचे वितरण दिलीप वळसे - पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोनग्रा यांच्या आत्मकथेचे पाच भागांचे प्रकाशनही करण्यात आले. दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट आणि आरती सोनग्रा उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शंभर कोटीचा निधी राखून ठेवला होता. मात्र, कोरोनामुळे राज्यात फार कार्यक्रम झाले नाहीत. भविष्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून हे कार्यक्रम कसे करता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला योग्य तो निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.
प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, लोकमांगल्य हा शब्द दलित साहित्याबद्दल अण्णा भाऊंनी पहिल्यांदा वापरला. क्रांती ही हे विद्रूप जग सुंदर करण्यासाठी करतो. हे विद्रूप जग आपल्याला सुंदर करायचे आहे. ही क्रांतिकारकांची भूमिका होती, ती अण्णा भाऊ साठे यांचीही होती.
वैराट यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची मदत देऊन महामंडळाला संजीवनी द्यावी अशी मागणी केली.
काशीनाथ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
-----
फुकट बिर्याणी....ही बाब गंभीर
फुकट मटण, बिर्याणी मागितल्याची ध्वनीफित व्हायरल झाली आहे. त्यावर एका कर्मचा-यावर कारवाई केल्याच्या रोषातून आपल्याविरोधात ही ध्वनिफीत प्रसारित करण्यात आल्याचा दावा संबंधित महिला पोलीस अधिका-याने केला आहे. त्यावर वळसे पाटील म्हणाले, ही माहिती अतिशय गंभीर स्वरूपाची असून, पोलीस आयुक्तांना मी सर्व बाजूने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य सरकारला त्यासंदर्भातील भूमिका घेता येईल.
--------------------------------------------