बनावट कागदपत्रांद्वारे वाडिया ट्रस्टची जागा बळकाविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:31+5:302021-05-19T04:12:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे वाडिया ट्रस्टची जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांसह इतरांवर येरवडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे वाडिया ट्रस्टची जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांसह इतरांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिलिंद सखाराम गायकवाड (वय ५१, रा. निलांजली सोसायटी, कल्याणीनगर), प्रकाश विष्णू बराटे, राजेंद्र लक्ष्मण बराटे, भागिरथी बराटे, मनोहर लक्ष्मण बराटे व त्यांचे कुटुंबीय (रा. खडकी, येरवडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समीर सुरेंद्र महागावकर (वय ५२, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.
फारुक वाडिया (वय ८४) यांनी फिर्यादी समीर महागावकर यांच्या नावे पॉवर ऑफ अॅटर्नी दिली आहे. येरवडा येथील जमिनीचे क्षेत्र फारुख वाडिया यांचे नावावर असून त्याबाबत बराटे कुटुंबीयाविरोधात न्यायालयात २००८ पासून दावा चालू आहे. तरीही आरोपींनी १०० रुपयांचे स्टॅॅम्पपेपरवर साठेखत करारनामा, ताबा पावती व पॉवर ऑफ अॅटर्नी असे लिहून अतिक्रमण केले. तसेच मिलिंद गायकवाड यांनी त्या पत्त्यावर रेशनकार्ड काढून ती जागा स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार केली. ती जागा भाडेकरु मिलेनियम इंजिनिअर्स यांना बेकायदेशीरपणे भाड्याने देऊन ७ लाख रुपये अॅडव्हान्स आणि प्रतिमहिना दीड लाख रुपये भाडे घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.