राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:44 PM2018-04-03T14:44:57+5:302018-04-03T14:44:57+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोटाला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अमोल मुरलीधर घुले (रा़ मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़.
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोटाला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अमोल मुरलीधर घुले (रा़ मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना साधु वासवानी चौकातील महाराष्ट्र सहकारी संघाच्या कार्यालयाचे दुसऱ्या मजल्यावरील पॅसेजमध्ये १९ मार्च २०१८ रोजी सकाळी सव्वाअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडली होती़
याप्रकरणी नितीन धोंडीराम बनकर (वय ४८, रा़ लक्ष्मी रेसिडेन्सी, भायखळा, मुंबई) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत सदस्य आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला होता़ त्या भाजप पुरस्कृत सदस्यांनी मतदान पेटी आणि टेबल खुर्च्या भिरकावून दिल्याने एकच गोंधळ झाला होता़ या गोंधळामुळे अध्यक्षपदाची निवडणुक स्थगित करण्यात आली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राज्य सहकारी संघाचे दुसऱ्या मजल्यावरील पॅसेजमध्ये नितीन बनकर असताना अमोल घुले हे सहकारी संघाचे निवडणुकीचा राग मनात धरुन त्यांचे नेते संजय कुसाळकर, हिरामण सातकर, रामदास मोरे व इतर नेत्यांना तुम्ही त्रास दिला तर गोळ्या घालीन असे म्ळणून त्यांनी त्यांच्या कमरेला लावलेले सिल्व्हर रंगाचे रिव्हॉल्व्हर बाहेर काढून बनकर यांच्या पोटास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़
या घटनेमुळे राज्य सहकारी संघाची निवडणुक स्थगित करण्यात आली आहे़ त्यानंतर बनकर यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता़ घटनास्थळाला सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम़ एम़ मुजावर यांनी भेट दिली़ अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक एम़ एम़ मुजावर अधिक तपास करीत आहेत़