खुनाचा प्रयत्न; दोघांना ५ वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: August 5, 2015 03:03 AM2015-08-05T03:03:21+5:302015-08-05T03:03:21+5:30
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांवर वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दोघांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांवर वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दोघांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
अमित बन्सी चव्हाण (वय १९) व दीपक विठ्ठल चव्हाण (वय ३४, रा. ३३०, मंगळवार पेठ) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी किशोर भगवान वाघमारे (वय ३९, भीमनगर, मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. खटल्यात सरकारी वकील आसिफ बासित यांनी ६ साक्षीदार तपासले.
फिर्यादी किशोर वाघमारे हे रिक्षाचालक आहेत. २३ मे २००८ रोजी दुपारच्या सुमारास किशोर घरी आले असता, त्यांना दारात गर्दी दिसली. अमित चव्हाण आणि दीपक चव्हाण त्यांच्या जवळ आले. त्यांना त्यांचा भाऊ प्रशांतविषयी विचारणा करू लागले. तसेच
तुझा भाऊ प्रशांत वाघमारे
याने ‘आमचा भाऊ प्रितम चव्हाण याला मारले’ असे म्हणत त्यांनी किशोर यांना मारण्याची धमकी देत चॉपर व लोखंडी पाइपने वार करून खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघे किशोर यांच्या घरात शिरले. घरात असलेल्या प्रशांत वाघमारे यांच्यावरही वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.
दरम्यान, नुकसानभरपाईपोटी दंडातील रकमेतील चार हजार रुपये किशोर आणि प्रशांत यांना देण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल भोसले यांनी केला. (प्रतिनिधी)