सोन्याचा कळस चोरीचा प्रयत्न सतर्कतेमुळे फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:40 AM2018-12-20T01:40:33+5:302018-12-20T01:40:56+5:30
चोरांची टोळी : दोन सुरक्षा रक्षक व दोन भक्तांना मारहाण
आणे : जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध खंडोबा देवस्थानांपैकी एक व असंख्य खंडोबा भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नळावणे येथील कुलस्वामी खंडोबा मंदिराच्या सोन्याच्या कळसाच्या चोरीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला.
नळावणे येथील श्री खंडोबा मंदिरावर ५१ तोळे सोन्याचा मुलामा असलेला कळस आहे. नुकत्याच झालेल्या चंपाषष्टीला त्याचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला. मंदिरात देवाचा चांदीचा मुखवटा, चांदीच्या पादुका व चांदीची पालखी असते. मंगळवारी (दि. १८) रात्री १२.३० च्या सुमारास १२ ते १५ चोरट्यांनी मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदीवरून उडया मारून मंदिर परिसरात प्रवेश केला. तेथील रात्रपाळीचे दोन सुरक्षारक्षक व अन्य दोन खंडोबा भक्तांना बेदम मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले. तेथे राखणीसाठी असलेल्या दोन श्वानांना मारहाण करून कोंडून ठेवले. मंदिर परिसरात असलेल्या १४ सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापून टाकल्या. मंदिराला असलेल्या दोन्ही दरवाज्यांची कुलपे तोडून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. तेथील चांदीच्या पादुका व चांदीचा मुखवटा घेऊन तेथील इतर साहित्य अस्ताव्यस्त केले. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूने लांब काठीच्या सहाय्याने कळसावर हुक टाकून त्याला नायलॉनच्या दोरीची शिडी बांधली.
शिडीवरून कळसाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना तुकाराम गगे या सुरक्षारक्षकाने स्वत:ची सुटका करून घेऊन सायरन वाजवला. त्या आवाजाने अनेक ग्रामस्थांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. अचानक झालेला सायरनचा आवाज आणि मंदिराच्या दिशेने येणारा ग्रामस्थांचा लोंढा पाहून चोरट्यांनी देवाचा मुखवटा तटबंदीजवळ टाकून पोबारा केला.
जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मारहाण झालेले सुरक्षारक्षक तुकाराम गगे व खंडोबा भक्त चिवा गगे आणि अमित शिंदे यांना आळेफाटा येथे रुग्णालयात दाखल केले आहे. दुसरे सुरक्षारक्षक गोपीनाथ शिंदे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे करीत असून पोलिस श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केल्याचे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी सांगितले.