एटीएम फोडायचा प्रयत्न फसला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 07:17 PM2022-12-03T19:17:17+5:302022-12-03T19:18:47+5:30
एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा काॅल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाला...
पिंपरी : एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असलेले तीन जणांना अटक करण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी सतर्कता दाखवत यातील एका आरोपीला घटनास्थळी जेरबंद केले. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे गुरुवारी (दि. १) रात्री सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
आदित्य भीमराव कांबळे (वय २०, रा. पिंपळे गुरव), विशाल बंडू कारके (वय २२, रा. चिखली), प्रथमेश प्रकाश जाधव (वय २०, रा. पिपळे गुरव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे गुरुवारी (दि. १) रात्री सव्वादोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे एका एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी हिंजवडी पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलीस नियमित तपासणीसाठी एटीएम सेंटरजवळ आले. पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळून गेले. त्यावेळी आदित्य कांबळे हा एटीएम सेंटरजवळ अंधारात लपून बसला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी आदित्य कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू केली.
दरम्यान, एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा काॅल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यानुसार नियंत्रण कक्षाकडून गस्तीवरील हिंजवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर एटीएम सेंटरमध्ये पोलिसांनी तपासणी केली असता, एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी आदित्य कांबळे याला पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली. त्याचे साथीदार विशाल कारके व प्रथमेश जाधव याच्यासह दुचाकीवरून येऊन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे व त्याचे दोन्ही साथीदार पळून गेल्याचे आदित्य कांबळे याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून विशाल कारके आणि प्रथमेश जाधव या दोघांना पिंपळे गुरव येथून अटक केली. ते दोघेही सातारा येथे पळून जण्याच्या तयारीत होते.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, रविंद्र मुदळ, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस कर्मचारी बी. बी. मारणे, बाळकृष्ण शिंदे, नागेश भालेराव, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, सचिन आगलावे, तोसीफ महात, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.