बारामतीच्या माळेगांव कारखाना ‘एमडी’च्या दालनात शेतकऱ्याचा पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:32 IST2022-02-07T18:32:39+5:302022-02-07T18:32:49+5:30
घटनेनंतर शेतकऱ्याला यांना कारखाना परिसरातील एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले

बारामतीच्या माळेगांव कारखाना ‘एमडी’च्या दालनात शेतकऱ्याचा पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न
माळेगांव : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या(एमडी) दालनामध्ये ऊस उत्पादक सभासद यांनी पेट्रोल मिश्रीत द्रव अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोमवारी (दि ७) १२ च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने कारखाना परिसरात खळबळ उडाली.
समीर शहाजी धुमाळ (रा. धुमाळवाडी, पणदरे ,ता.बारामती) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. धुमाळ हे १५ —७ ची लागण असलेला ऊस तोडण्याची प्रक्रिया साधारण 3 महिन्यापूर्वी संपून सुद्धा माझा ऊस का तोडून नेला नाही, याची विचारपूस करण्यासाठी आले होते.यावेळी कार्यकारी संचालक यांच्या दालनामध्ये शाब्दिक वाद झाल्याने सोबत आणलेल्या कॅनमधून पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु तिथे उपस्थित’ कारखाना संचालक मंगेश जगताप व माळेगाव येथील रणजित राजेंद्र तावरे यांनी त्यांना थांबविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर समीर यांना कारखाना परिसरातील एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की समीर धुमाळ व त्यांच्या भावकीमध्ये शेतजमिनीवरून कायदेशीर लढा चालू असल्याने ऊसतोडणी राखडलेली आहे.
...कारखाना प्रशासनाशी त्याचा वाद झाल्याने हा प्रकार घडला
समीर धुमाळ यांच्या कुटुंबियांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यापासून कारखाना प्रशासनाशी आमची बोलणी चालू आहेत. प्रत्येकवेळी अनेक कारणे सांगून आमचा ऊसतोडून नेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सोमवारी समीर विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कारखाना प्रशासनाशी त्याचा वाद झाल्याने हा प्रकार घडला.