बनावट गुणपत्रिकेद्वारे टपाल खात्यात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न
By नितीश गोवंडे | Updated: January 28, 2025 16:05 IST2025-01-28T16:04:48+5:302025-01-28T16:05:04+5:30
- फसवणूक प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

बनावट गुणपत्रिकेद्वारे टपाल खात्यात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न
पुणे : दहावी उत्तीर्ण झाल्याची बनावट गुणपत्रिका सादर करुन टपाल खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. रमेश भिकाजी मुळे (२२, रा. अलकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याबाबत सचिन कामठे (३८, रा. सागर पार्क, वडगाव शेरी) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टपाल खात्याकडून डाकसेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन भरती महाराष्ट्र सर्कल २०२३ (सायकल ५) परीक्षेत मुळे याने दहावी उत्तीर्ण असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर केले.
बनावट गुणपत्रिकेद्वारे त्याने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. शहर टपाल कार्यालयातील (सिटी पोस्ट) अधिकारी सचिन कामठे यांनी गुणपत्रिकेची पडताळणी केली. तेव्हा गुणपत्रिका बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे पुढील तपास करत आहेत.