तोतया डॉक्टरच्या माध्यमातून जमीन हडपण्याचा प्रयत्न; बारामतीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 12:50 PM2023-04-02T12:50:06+5:302023-04-02T12:52:53+5:30
बारामती शहरामध्ये ५८२ चौरस मीटरचा प्लॉट आरोपीने स्वतःच्या नावावर करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडला
बारामती :तोतया डॉक्टरच्या माध्यमातून करून जमीन हडपण्याचा प्रकार बारामतीपोलिसांनी हाणून पाडला आहे. याबाबत दोन्ही आरोपींना अटक झाली असून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी दिली आहे. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विद्या शांताराम शिंदे (वय ६२, रा. शास्त्रीनगर येरवडा) या १९९४ साली बारामती मध्ये वैद्यकिय व्यवसाय करत होत्या. त्यावेळी भावी आयुष्यातील बचत म्हणून त्यांनी बारामती शहरामध्ये ५८२ चौरस मीटरचा प्लॉट विकत घेतला होता. त्यानंतर वैद्यकिय व्यवसाय निमित्त त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या. नंतर बारामती शहराचा विस्तार वाढत गेला जमिनीचे भाव हळूहळू वाढत गगनाला भिडले. त्यांना वाटले आपला प्लॉट बारामती मध्ये सुरक्षित आहे. दरम्यान इसम नामे मंगेश विलास काळे (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) याच्या लक्षात आलं की डॉक्टर विद्या शिंदे या पुण्याला स्थलांतरित झालेले आहेत, तसेच त्यांचे प्लॉट कडे त्यांचे विशेष लक्ष नाही. त्याने याचा फायदा घेत विद्या शांताराम शिंदे यांच्या नावे रंजना दत्तात्रय गार्डी (वय ६०, रा. वेडणी ता. फलटण) यांना डॉक्टर विद्या शिंदे म्हणून हवेली दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये उभे केले.
तोतया डॉक्टर रंजना गार्डी यांच्या नावावरून मंगेश काळे याने स्वत:च्या नावावर बनावट कुलमुखत्यारपत्र करून घेतले. नंतर त्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारावर बारामती मध्ये विद्या शांताराम शिंदे यांचे कुलमुखत्यार धारक मंगेश विलास काळे यांच्या वतीने स्वत:च्या नावावर संपूर्ण खरेदीखत दुय्यम निबंधक कार्यालय बारामती मध्ये केले. यानंतर बारामती शहरामध्ये प्लॉटिंग एजंटच्या मार्फत सदरचा प्लॉट त्याला विकायचा आहे, अशी जाहिरात सुरू केली. सोशल मीडियावरील जाहिरात बघून मग फियार्दी डॉ. विद्या शिंदे यांच्या ओळखीतील एकाने सांगितले ‘की त्यांचा प्लॉट मंगेश काळे यांना कधी विकलेला आहे.’ ज्यांनी फोन करून सांगितले त्यांना तो प्लॉट विद्या शिंदे यांच्याकडून घ्यायचा होता परंतु त्यांनी विक्रीस नकार दिलेला होता. या इसमाला देखील या व्यवहारामध्ये संशय आला. त्याने डॉ. विद्या शिंदे यांना फोन केला. यावेळी प्लॉट विक्रीबाबत विचारणा केली असता. डॉ. शिंदे यांनी अद्याप आपला प्लॉट विकलेला नाही, त्याचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडे आहेत. नंतर त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी जाऊन खात्री केली असता बनावट कुलमुखत्यार पत्र पुण्यात बनवून त्याचे आधारे मंगेश विलास काळे यांनी संपूर्ण खत खरेदी खत करून प्लॉट विक्रीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. विक्रीची दुय्यम प्रत दुय्यम निबंधक कार्यालयातून काढली. तसेच मंगेश विलास काळे याने त्या खरेदी खताचा वापर करून प्रॉपर्टी कार्डवर फेरफार नोंद करून स्वत:च्या नावावर सातबारा करून घेतला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. शिंदे यांनीपोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर तपासाची चक्रे फिरवत शहर पोलिसांनी आरोपी मंगेश विलास काळे व त्याने उभी केलेली तोतया डॉक्टर रंजना दत्तात्रय गार्डी या दोघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, कल्याण खांडेकर व अजय देवकर यांनी केली.
''बारामती मध्ये किंवा आसपासच्या परिसरात ज्यांनी खूप वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेले आहेत त्यांनी अधून मधून दुय्यम निबंध कार्यालय व तलाठी महसूल यांच्याकडे चौकशी करून आपल्या मालमत्तेची खात्री करावी. सध्या जमिनीचे भाव वाढत आहेत. आणि त्याच्यातून अशी फसवेगिरी होत आहे. ही फसवेगिरी दाखल झाल्यानंतर आरोपी पण अटक होत आहेत. परंतु परत खोटे केलेले खरेदीपत्र पुन्हा स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी खर्च येतो. फी भरावी लागते. तसेच मुळ मालकाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. सर्वांनी आपल्या मालमत्तेच्या बाबतीत जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. - सुनिल महाडीक पोलिस निरिक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे''