ऑक्सिजन मास्क काढून मामाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, भाच्याला दोन वर्षे सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:47 PM2023-09-06T19:47:50+5:302023-09-06T19:48:01+5:30
नाका-तोंडावर टॉवेल टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न...
नारायणगाव (पुणे) : मामाच्या नाकाला लावलेल्या ऑक्सिजनचा मास्क काढून त्यांच्या नाका-तोंडावर टॉवेल टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाच्याला राजगुरुनगर (खेड) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी गुन्ह्यात दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास तसेच १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत यांचे डॉ. मिनू मेहता हॉस्पिटलमध्ये पुरुषोत्तम मधुकर कुलकर्णी (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) हे दि. ९ मे २०१२ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विषबाधा झाल्याने आयसीयू वॉर्डात उपचार घेत होते. फिर्यादी विशाल विजय कुलकर्णी (रा. बोटा, ता. संगमनेर) याचा मावसभाऊ असलेला आरोपी विठ्ठल एकनाथ असलेकर (रा. जांबूत, ता. शिरूर, जि. पुणे) याचे आईवडील यांच्यात झालेले भांडण मामा पुरुषोत्तम यांनी मिटविले नाही याचा राग मनात धरून त्यांच्यावर उपचारासाठी लावलेल्या सलाईन व त्यांच्या नाकाला लावलेल्या ऑक्सिजनचा मास्क काढून त्यांच्या नाका-तोंडावर टॉवेल टाकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
या गुन्ह्यात दोषी धरून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद सोा राजगुरुनगर (खेड) यांनी आरोपीस भादंवि कलम ३०७ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास तसेच १००० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास तसेच भादंवि कलम ३२८ अन्वये १००० रु. दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी अधिकारी सपोनि आवताडे यांनी केला होता. गुन्ह्यात सरकारी वकील देशमुख मॅडम व रासकर मॅडम यांनी काम पाहिले. तसेच गुन्ह्याचे कोर्टाचे कामकाज नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल वाय. डी. गारगोटे यांनी काम पाहिले. तसेच जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी व खेड कोर्ट पैरवी अधिकारी सहायक फौजदार खरात यांनी काम पाहिले.