Pune: आईलाच जिवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आवळल्या मुलाच्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:26 PM2023-07-19T17:26:36+5:302023-07-19T17:28:56+5:30
महिलेस स्वतःच्याच मुलाने जिवंत मारण्याचा प्रयत्न केला...
ओतूर (पुणे) : हिवरे बुद्रुक (कैलासनगर, ता. जुन्नर) येथील विमल विठ्ठल भोर (वय ६७) या महिलेस स्वतःच्याच मुलाने जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगेश विठ्ठल भोर (वय ३०) याला अटक करण्यात आली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे, अशी माहिती ओतूर सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
कांडगे म्हणाले, विमल भोर यांचा मुलगा मंगेश भोर याने आपली आई बेपत्ता झाल्याची तक्रार ओतूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिस हवालदार महेश पटारे यांनी या घटनेचा अधिक तपास केला असता संबंधित महिला पोलिसांना खेड तालुक्यातील आळंदी येथे आढळून आली. याबाबत या महिलेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मुलगा मंगेश भोर याला दारूचे व्यसन असून त्याचे लग्न होत नसल्याने त्याच्याकडून सतत मला शिवीगाळ दमदाटी व मारहाण होत होती. या मुलाच्या छळाला कंटाळून यापूर्वी तीन वेळा घर सोडून निघून गेले होते.
१३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुलगा मंगेश याने त्याची बहीण सुनीता सुनील कुटे हिला फोन केला होता. मात्र, तिने फोन उचलला नाही. या कारणावरून मंगेशने शिवीगाळ व दमदाटी करून माझ्या पाठीत व कमरेवर लाथा मारून तुला आज जिवंतच ठेवत नाही, असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने नायलॉनच्या दोरीने माझा डावा पाय व दोन्ही हात बांधले. त्यानंतर माझ्या अंगावर व डोक्यावर डिझेल ओतले. घरात माचीस सापडत नसल्याने घराच्या पुढच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून मुलगा मंगेश माचीस आणण्यासाठी बाहेर गेला. त्यावेळी मी मोठ्या शिताफीने माझ्या हातापायाला बांधलेली दोरी सोडून घराच्या मागच्या दरवाजाने पळून गेले. मुलगा मंगेश याच्या भीतीमुळे मी आळंदी येथे राहत असल्याचे विमल भोर यांनी फिर्यादीत सांगितले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी विविध कलमांन्वये मंगेश भोर याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली असल्याचे ओतूर सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी सांगितले.