कारागृह महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; जेलरला अटक
By विवेक भुसे | Published: August 15, 2023 12:43 PM2023-08-15T12:43:48+5:302023-08-15T12:46:09+5:30
तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...
पुणे : कारागृह महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जेलरने गुन्हा मागे घेण्यासाठी वारंवार फोन करुन महिलेच्या घरी जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येरवडा पोलिसांनी वरिष्ठ जेलर योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली आहे. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कारागृह शिपाई म्हणून काम करतात. त्यांनी आरोपी योगेश पाटील याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. पाटील फिर्यादी यांना वारंवार फोन करुन तो गुन्हा मागे घे व माझ्याशी बोल, मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे बोलत असे. सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या कामावरुन घरी येत असताना त्याने फियांदी यांना गाठले. मला माहिती आहे तू भाड्याचे घरात राहतेस. आधीच तुझ्या इज्जतीची थु थु झाली आहे. तुला इथे लोक राहू देणार नाहीत. माझ्याबरोबर शांत चल, असे बोलून फिर्यादीच्या घरी आला.
फिर्यादीचे घरातील वॉशिग मशीन घेऊन गेला. काही वेळाने परत आला तेव्हा त्याच्या हातात पेट्रोलने भरलेली प्लॉस्टिकची बाटली होती. तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकून काड्याची पेटी काढून तिने पेटविण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला धक्का देऊन आतील खोलीत जाऊन दरवाजा लावून घेऊन स्वत:चा जीव वाचविला आहे. पोलिसांनी या जेलरला अटक केली असून पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.