भोरमधील धक्कादायक प्रकार! जमिनीच्या वादातून शेतकरी महिलेला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:48 PM2022-11-25T19:48:05+5:302022-11-25T19:48:13+5:30
आरोपीने अत्यंत शिताफीने रचला होता प्लॅन
नसरापूर : भोर तालुक्यातील भांबवडे येथील शेतकरी महिलेला शेतातच विजेच्या प्रवाहद्वारे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नसरापूर येथील किकवी राजगड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. हिराबाई दत्तात्रय कापरे (वय ५८) असे ज्येष्ठ महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी विजय निवृत्ती सुर्वे (वय ३८) याला राजगड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भांबवडे (ता. भोर) येथील हिराबाई कापरे यांच्या दिराकडून विजय सुर्वे यांनी दिड गुंठा जमीन खरेदी केली आहे. परंतु शेतजमीन आणि विहीर याबाबत वाद सुरू असून त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. दि.१८ रोजी विजय सुर्वे यांनी हिराबाई यांना तुम्ही मला पाणी दिले नाही. तर मी तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर हिराबाई यांचे पती शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना विजय सुर्वे हे लाईटच्या खांबा जवळ काहीतरी करत असल्याचे आढळून आले. मात्र कापरे नवरा बायको शेतीला पाणी देण्याच्या कामात असल्याने त्यांनी सुर्वे काही तरी विपरीत करत असल्याचे पाहूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर हिराबाई या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र काही ज्वारी भिजवत त्या पुढच्या चाऱ्यात त्यांनी पाऊल टाकले तेव्हा त्यांना विजेचा जोरात झटका बसला. गंजलेली तार इथे कशी आली हे पाहण्यासाठी त्या पुढे गेल्या. तर त्यांना विजेच्या खांबावर आकडा टाकलेला दिसला. खांबावरून ती तार ज्वारीच्या शेतापर्यंत आणलेल्याचे निदर्शनास आले आहे. शॉक लागल्यानंतर नातेवाईक व वायरमन यांनी पाहणी केली असता सरीमधील वायर ही शेजारी असलेल्या उसाच्या शेतातील खांबावरून आकडा टाकून ती लपवत-लपवत फिर्यादीच्या ज्वारी पाणी देण्याच्या ठिकाणापर्यंत आणून जोडली असल्याचे उघड झाले होते.
त्यामुळे त्यांनी घटनेची शहानिशा केल्यानंतर जवळ असलेल्या किकवी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावल्यानंतर सुर्वे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच हे कृत्य आपणच केल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगाव, पोलिस कर्मचारी व महावितरणाचे कर्मचारी यांनी पाहणी करून पंचनामा केला.पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.