लष्करी जवानाकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:52+5:302021-06-02T04:10:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान ८ वर्षांच्या मुलीवर लष्करातील जवानाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान ८ वर्षांच्या मुलीवर लष्करातील जवानाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीला जाग आल्याने तिने आरडाओरडा केल्यावर तिला चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकून देण्यात आले. रेल्वे मार्गाच्या कडेला जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीकडून ही हकीकत समजताच लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण रेल्वे सील करून चालत्या गाडीत शोध घेऊन घटनेनंतर ६ तासांत आरोपीला पकडले.
प्रभू मलाप्पा उपहार (वय ३३, रा. संगळ, पो. सुगमधूर, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या लष्करात नाईक पदावर असून झाशी येथील युनिट १८२ येथे तो नियुक्तीला आहे.
गोवा-निझामुद्दीन ही एक्सप्रेस सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सातारा रेल्वे स्टेशनवर आली. त्यानंतर ती लोणंदच्या दिशेने निघाली. लोणंद ते सालपा रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे मार्गालगत एक ८ वर्षांची मुलगी जखमी अवस्थेत स्थानिकांना मिळाली. त्याची माहिती मिळाल्यावर मिरज लोहमार्ग पोलिसांकडील उपनिरीक्षक तारडे व त्यांचे सहकारी तसेच आरपीएफ सातारा हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी मुलीला उपचाराकरिता सातारा सिव्हिल हॉस्पिटलला आणले. तेथे उपचारादरम्यान या मुलीने मी, आई, वडील, भाऊ व बहीण गोव्याहून दिल्लीकडे जाण्यासाठी निघालो होतो. रात्री जेवण करुन झोपल्यावर उशिरा एकाने मला उचलून बाथरूममध्ये नेले. तो माझे कपडे काढत असताना मला जाग आली. मी आरडाओरडा केला. तेव्हा त्याने मला आईबाबाकडे नेतो, असे सांगून रेल्वेच्या दरवाजातून बाहेर फेकून दिले.
ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. या मार्गावर असलेल्या सर्व रेल्वे स्टेशनला उपलब्ध कर्मचारी नेमून सर्व बोग्या ब्लॉक केल्या. मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीस रेल्वेमध्ये आरोपीचा शोध घेऊ लागले. आरोपी पळून जाऊ नये, म्हणून वाटेत रेल्वे न थांबविण्याची सूचना रेल्वे चालकाला देण्यात आल्या. रेल्वेत ५० ते ८० किमीपर्यंत प्रवास करून पोलिसांनी चार संशयितांना भुसावळ रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेतले. त्यापैकी एकाने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तातडीने तपास केल्याने आरोपी सापडू शकला.
...
तब्बल ३०० कर्मचाऱ्यांनी घेतला शोध
आरोपी पळून जाऊ नये, म्हणून प्रत्येक स्टेशनवर पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील हे सातत्याने अपडेट घेत होते. संपूर्ण एक्सप्रेस ब्लॉक करण्यात आली होती. भुसावळपर्यंत कोणालाही कोणत्याही कारणासाठी खाली उतरू दिले नाही. रेल्वे ज्या स्टेशनवर थांबत होती, तेथे रेल्वे पोलिसांचा फौजफाटा प्रत्येक डब्याजवळ जाऊन कोणीही बाहेर पळून जात नाही ना याकडे लक्ष ठेवून होते. सर्व प्रवाशांना सहकार्य करण्याचे पोलिसांनी आवाहन केले. शेवटी मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार संशयिताला भुसावळ रेल्वे स्थानकावर पकडले. त्याला आज दुपारी पुणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
......
हा प्रकार समजताच अभिनव पद्धतीने तपास सुरू केला. त्यासाठी ३०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत केले. मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील एकाला मुलीने ओळखल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. वेळेत आणि वेगवान पद्धतीने तपास केल्याने संशयित हाताशी लागू शकला.
सदानंद वायसे-पाटील, अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, पुणे