हिंदुराष्ट्रसेनेशी संबंधित मोक्कातील आरोपीवर ‘ससून’मध्ये हल्ल्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:38 AM2022-09-06T11:38:40+5:302022-09-06T11:39:06+5:30
पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले
पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हिंदुराष्ट्रसेनेशी संबंधित तुषार हंबीर या मोक्काच्या आरोपीवर तीन ते चार जणांनी सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधित पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.
ससून रुग्णालयातील इन्फोसिस इमारतीमध्ये सोमवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर हल्लेखोर फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. थेट ससून रुग्णालयात शिरून हल्ला करण्याच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील त्याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
अधिक माहितीनुसार, तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो मोक्कामध्ये येरवडा कारागृहात बंद आहे. आजारी असल्यामुळे २५ ऑगस्टपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तो हिंदूराष्ट्र सेना, धनंजय देसाई याच्या जवळचा कार्यकर्ता ससून रुग्णालयाच्या इन्फोसिस इमारतीत न्यूरो सर्जन विभागात उपचार घेत आहे. अनेक वेळा या वॉर्डमध्ये सतत उपचारार्थ दाखल होत असतो.
दरम्यान, सोमवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास तीन ते चार जण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. त्याच्यावर उपचार सुरू असलेल्या ठिकाणी येऊन त्यांनी हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. तेथे ड्यूटीवर असलेल्या पोलिसाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली.