Pune: पेट्रोलिंग करणाऱ्या डेक्कन बीट मार्शलवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल कडून गोळीबार
By नम्रता फडणीस | Updated: October 22, 2024 16:16 IST2024-10-22T16:16:16+5:302024-10-22T16:16:57+5:30
टोळक्यातील दोन संशयितांनी एका बीट मार्शलवर करवतीने हातावर वार केल्यानंतर स्वरक्षणार्थ बीट मार्शलने टोळीवर गोळीबार केला

Pune: पेट्रोलिंग करणाऱ्या डेक्कन बीट मार्शलवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल कडून गोळीबार
पुणे : पेट्रोलिंग करीत असताना बीट मार्शलवर टोळक्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील अभिनव इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ घडली. टोळक्यातील दोन संशयितांनी एका बीट मार्शलवर करवतीने हातावर वार केल्यानंतर स्वरक्षणार्थ बीट मार्शलने टोळीवर गोळीबार केला. मात्र, टोळके पसार झाले. याप्रकरणी सहा जणांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये चंदनचोरीच्या उददेशाने चोरटे आले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
महेश तांबे आणि गणेश जाधव अशी टोळक्याशी प्रतिकार केलेल्या बीट मार्शलची नावे आहेत. डेक्कन पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बिट मार्शल रात्री अडीच वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील अभिनव इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोन संशयित दिसले. बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये आणखी चार लोक शिरलेले दिसले. ते कदाचित चंदनचोरीच्या उद्देशाने आलेले होते. त्यांच्या हातात करवतीसारखे धारदार शस्त्र होते. त्यावेळी सहा जणांची बीट मार्शलबरोबर झटापट झाली. बीट मार्शलने त्याना प्रतिकार करण्याबरोबरच पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित आरोपी पळून जात असताना बीट मार्शलने गोळीबार केला. त्यातील एक बीट मार्शलच्या हातावर करवतीने खरचटल्यामुळे ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डेक्कन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.