पुण्यात तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांच्या चिंतेत वाढ
By दीपक होमकर | Published: September 23, 2022 07:24 PM2022-09-23T19:24:09+5:302022-09-23T19:27:18+5:30
ही घटना कोंढवा परिसरात येवलेवाडी गावात आज सकाळी सातच्या सुमारास घडली..
पुणे : येवलेवाडी येथील एकाच शाळेतील तीन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मुलींच्या हुशारीमुळे एकीचेही अपहरण झाले नसून तिघीही मुली सुखरुप आहे. याबाबत मुलींनी शाळेत आणि घरी सांगितल्यानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार केली आहे. ही घटना कोंढवा परिसरात येवलेवाडी गावात आज सकाळी सातच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, आज (शुक्रवारी) सकाली सातच्या सुमारास येवलेवाडी परिसरातील एका शाळेमध्ये जाण्यासाठी शाळेची विद्यार्थीनी घरातून पायी निघाली होती. काही अंतर चालल्यावर रस्त्याच्या कडेला एका व्हॅॅनजवळील व्यक्तीने तिला आडवले आणि तुझी आई आजारी असून दवाखान्यात नेले आहे तुला तिकडेच नेण्यासाठी आम्हाला पाठवले असल्याचे त्यांनी मुलीला सांगितले. मात्र मुलीने सांगितले आत्ताच आईने मला शाळेत पाठवले आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही आणि मुलीने तेथून काढता पाय घेत पळत जवळ असलेली शाळा गाठली.
त्या मुलीच्या पाठोपाठ येणाऱ्या आणखी दोन मुलींंनाही हाच अनुभव आला. त्यातील एका मुलीला तर गाडीत बस म्हणून त्यांनी दमदाटीही केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र मुलींनी पळ काढून शाळा गाठली. ही बातमी शिक्षकांना सांगितल्यावर त्यांनी शिक्षकांनी मुख्यांध्यापकांना सांगितली त्यानंतर शिक्षकांनी शाळेच्या रस्त्यावर व परिसरात व्हॅनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र व्हॅन दिसली नाही. त्यानंतर मुख्याध्यापकांनी ही बाब पोलिसामध्ये तक्रार दाखल केली.
टोळी दाखल झाल्याची अफवाच
कोंढवामध्ये हे प्रकरण घडत असताना याच परिसरात असलेल्या लुल्ला नगर परिसरातील आणखी एका शाळेतील दोन मुलींची अपहरण घडले असल्याची बातमी आज कोंढवा परिसरात वाऱ्यासारखी पसरत होती. याबाबत पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या की संबधीत शाळेत जाऊन आम्ही मुख्याध्यापकांना भेटलो. त्यांनी सर्व मुलींची मोजणी करून आम्हाला दाखविली शिवाय एकाही पालकांकडून मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नाहीत. त्यामुळे या परिसरात मुले पळविणारी टोळी दाखल झाल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. मुलांची विक्री केली गेल्याचे व्हिडीओ हा सुद्दा महाराष्ट्राच्या बाहेरचा जुना व्हिडीओ आहे व त्यामध्ये बरेच एडिटींग केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि असे व्हिडीओ दुसऱ्यांना पाठवू नये असे आवाहन पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी केले आहे.