हातगाडीमधील वादातून कामगाराच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:17+5:302021-01-01T04:08:17+5:30
पुणे : फुटपाथवरील दोन हातगाड्यांमधील आर्थिक वादातून एका गाडीवरील कामगाराला कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. पंकज शर्मा ...
पुणे : फुटपाथवरील दोन हातगाड्यांमधील आर्थिक वादातून एका गाडीवरील कामगाराला कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. पंकज शर्मा (वय २८, रा. विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी राज बबन राक्षे (वय १८) आणि प्रविण ऊर्फ पव्या संभाजी सुखदरे (वय ३०, दोघे रा. शांतीनगर, विश्रांतवाडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
ऑरबीट मॉलसमोरील फुटपाथवर गौरंगी डोसा व वडापाव सेंटरचे हातगाडीवर पंकज शर्मा काम करतात. त्यांच्या शेजारी भैरवनाथ डोसा व वडापाव सेंटर आहे. त्या हातगाडीच्या मालकीण महिलेने जुन्या वादातून शर्मा याला तु तेथे का काम करतोस, तुमच्या हातगाडीमुळे आमचा धंदा होत नाही. तू येथे काम करु नकोस, येथून निघून जा, नाही तर तुला जीवंत सोडणार नाही असे बोलून शर्मा याला शिवीगाळ केली. राज राक्षे व प्रविण यांनी शर्मा याला बांबुने मारहाण करुन कोयत्याने वार करुन जबर जखमी केले. शर्मा हे जीव वाचविण्यासाठी पळत असताना राक्षे याने पाठलाग करुन उजव्या मांडीवर काेयत्याने वार केला. सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव अधिक तपास करीत आहेत.