अवसरी बुद्रुक चौथाई स्थळ भागात दरोड्याचा प्रयत्न, चार लाख पन्नास हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:47+5:302021-07-12T04:07:47+5:30
अवसरी बुद्रुक येथील चौथाई स्थळ या भागात गणेश हिंगे यांचे घर आहे. पहाटेच्या वेळेस गणेश हिंगे यांच्या घराच्या मागील ...
अवसरी बुद्रुक येथील चौथाई स्थळ या भागात गणेश हिंगे यांचे घर आहे. पहाटेच्या वेळेस गणेश हिंगे यांच्या घराच्या मागील दरवाजा कटावणीच्या साह्याने उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून घरात असणाऱ्या लोखंडी कपाटातून अकरा तोळे सोने त्यात अडीच तोळ्यांचे नेकलेस, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे ब्रेसलेट, अर्ध्या तोळ्यांच्या दोन अंगठ्या असे नऊ तोळे सोन्यांचे दागिने व तीन हजार पाचशे रुपये, खुंटीला अडकवलेल्या पॅन्टमधील पस्तीस हजार रुपये लांबवले आहे. लोखंडी कपाट असणाऱ्या खोलीमध्ये गणेश हिंगे हे कपाटाच्या बाजूलाच झोपलेले असताना देखील चोरट्यांनी कपाट उचकटून चोरी केली. हिंगे यांना चोरट्यांनी भूल दिली असावी असा अंदाज व्यक्त केला असून, चोरीचे सर्व सामान घराच्या मागील बाजूस अस्तव्यस्त करून त्यातील फक्त सोन्याचे दागिने चोरी केले व बाकीचे खोटे दागिने तिथे ठेवले आहेत. गावडेवाडी फाटा येथे पहाटे तीनच्या सुमारास तय्यब जमादार यांचेही घर चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता.जमादार यांच्या आईला आवाज आल्याने त्या जाग्या झाल्याने तीन चोरट्यांनी तेथून पळ काढला. जारकड मळा येथे महेंद्र जारकड यांच्या घराजवळ असणारी ईरटिगा गाडीमध्ये ज्वेलर्सची पिशवी असल्याकारणाने त्यांच्या गाडीची काच फोडून पिशवी पळवली.
घटनास्थळी मंचर पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक फौजदार राजेंद्र कांबळे, पोलीस पाटील माधुरी जाधव, तंटा मुक्त समिती अध्यक्ष सर्जेराव हिंगे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपासून अनोळखी फेरीवाले अवसरी बुद्रुक व परिसरात मोठ्या प्रमाणावर फिरताना आढळून येत आहेत त्यात मोटरसायकलवर तीळ, मटकी फुटाणे, ब्लॅंकेट, झाडू, खुर्ची विकत असून छोट्या हत्ती सारख्या वाहनांमध्ये नवखे लोक भंगार गोळा करतानाही आढळत आहेत. त्यांच्यावरही नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.
गणेश हिंगे व माजी उपसरपंच किशोर हिंगे यांनी दरोड्यांसंदर्भात मंचर पोलिसांना माहिती दिली.
अवसरी बुद्रुक येथील चौथाई स्थळ या भागात गणेश हिंगे यांच्या घरी पडलेल्या दरोड्याची पाहणी करताना मंचर पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे व सहायक फौजदार राजेंद्र कांबळे यांना माहिती देताना गणेश हिंगे व नीलेश हिंगे.