पुण्यात धनत्रयोदशीच्या दिवशीच दरोड्याचा प्रयत्न; हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:06 PM2022-10-23T12:06:26+5:302022-10-23T12:06:35+5:30
दत्तनगर जांभूळवाडी रस्त्यावरील ज्वेलर्सच्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न असफल
धनकवडी : धनत्रयोदशीच्या दिवशीच सशस्त्र दरोडा टाकून अधिक लुट मिळेल या उद्देशाने एका ज्वेलर्सच्या दुकानात तीन दरोडेखोर घुसले. मात्र दुकानदाराने प्रसंगावधान दाखवून अलार्म वाजविल्याने दरोडेखोरांचा प्रयत्न फसला आणि ते पळून जाऊ लागले, जाताना त्यांनी हवेत गोळीबार केला या गोळीबारात दुकानाची काच फुटली. हि घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेगावात घडली. श्री मल्हार ज्वेलर्स असे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या सोन्या चांदीच्या दुकानाचे नाव आहे.
शनिवारी दिवाळीचा पहिलाच दिवस सर्वत्र मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील तसेच दरोडेखोर पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तनगर चौकातून जांभूळवाडी कडे जाणाऱ्या मार्गावर आँलीव्ह सोसायटी मध्ये श्री मल्हार ज्वेलर्स म्हणून सोन्या चांदीचे दुकान आहे. दुकानाच्या मालकाचे नाव मुळ मालक मकरंद पावले, कोल्हापूर मध्ये असतात. आकाश कडोले हे दुकान बघतात. शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान आकाश भरस कडोले (वय २८ वर्ष रा. रविवार पेठ ) दुकानातील आवरा अवर करून दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात रिव्हॉल्व्हर आणि कोयता घेऊन दोन दरोडेखोर दुकानात शिरले, सशस्त्र चोरांना पाहून घाबरलेल्या दुकानदाराने लगेच अलार्म दाबला.. अलार्म चा आवाज ऐकून दोघेही पळून जाऊ लागले. मात्र जाताना त्यांनी हवेत गोळीबार केला या गोळीबारातील एक गोळी दुकानाच्या काचेला लागून काच फुटली. बाहेर एकजण उभा होता. जाताना तिघेजण दुचाकीवरून पसार झाले.