पिंपरीतील धक्कादायक प्रकार; २ महिन्यापासून पगार दिला नसल्याने महापालिकेसमोर कंत्राटी डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 08:45 PM2021-12-17T20:45:44+5:302021-12-17T20:45:53+5:30
वायसीएम रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर कंत्राटी तत्वावर काम करत असून गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिला नाही, तसेच पगारात कपात केली जाते, सुटी दिली जात नाही, या कारणावरून उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात बीव्हीजी इंडीया या ठेकेदार कंपनीमार्फत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या डॉक्टरने दोन महिन्यापासून पगार होत नसल्याने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर दुपारी तीनच्या सुमारास घडली.
महेंद्र अच्युतराव चाटे (वय ३१, रा. मोशी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. चाटे हे बीव्हीजी इंडीया या ठेकदार कंपनीमार्फत वायसीएम रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर कंत्राटी तत्वावर काम करतात. गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिला नाही. तसेच पगारात कपात केली जाते. सुटी दिली जात नाही. यामुळे डॉ. चाटे त्रस्त झाले होते. या नैराश्यातून ते शुक्रवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आले आणि अचानक अंगावर डिझेल ओतून घेण्यास सुरूवात केली. हा प्रकार निदर्शनास येताच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेत डॉ. चाटे यांना रोखले. त्यांच्या हातातील लायटर ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांची समजूत घातली.
सुरक्षा अधिकारी गोफणे यांनी त्वरीत हा प्रकार पिंपरी पोलीसांना कळविला. पिंपरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन डॉ. चाटे यांना ताब्यात घेतले. पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली.