गोळी झाडून घेत सराफ व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:57+5:302020-12-17T04:37:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ब‌ळवंत अरविंद मराठे (वय ६०, रा. रुपाली बिल्डिंग, शिवाजीनगर) या लक्ष्मी रस्त्यावरील सराफ व्यावसायिकाने ...

Attempted suicide by a goldsmith | गोळी झाडून घेत सराफ व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

गोळी झाडून घेत सराफ व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ब‌ळवंत अरविंद मराठे (वय ६०, रा. रुपाली बिल्डिंग, शिवाजीनगर) या लक्ष्मी रस्त्यावरील सराफ व्यावसायिकाने व्यवसायातील आर्थिक नुकसानीतून स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

लक्ष्मी रस्त्यावरील ‘मराठे ज्वेलर्स’ या दुकानात मंगळवारी (दि. १५) सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबतची माहिती अशी, बळवंत मराठे हे लक्ष्मी रस्त्यावरील ‘मराठे ज्वेलर्स’ हे दुकान पाहतात. त्यांचा मुलगा प्रणव एका खासगी कंपनीत व्यवस्थापक आहे. बळवंत हे मंगळवारी सायंकाळी दुकानात एकटेच होते. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली आणि पत्नीला कळविले. त्यांच्या पत्नीने ही बाब मुलगा प्रणव यांना सांगितली. प्रणव याने दुाकानाच्या मागील बाजूने कार्यालयात प्रवेश केला. पोटमाळ्यावरील कार्यालयात त्यांचे वडील बळवंत हे जखमी अवस्थेत पडले होते. त्यानंतर प्रणव यांनी पोलिसांच्या मदतीने वडलांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. व्यवसायात मंदी तसेच आर्थिक अडचणीमुळे माझ्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रणव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

चौकट

“बळवंत मराठे यांनी गोळी झाडून घेतल्यानंतर पत्नीला फोन केला. पत्नीने तातडीने मुलाला या घटनेची माहिती दिली. त्यांचा मुलगा प्रणव हा तातडीने दुकानात आला. त्याने रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु, ती लवकर येत नसल्याने त्याने जवळच्या नारायण पेठ पोलीस चौकीत कॉल केला. तेथील बीट मार्शल माने हे तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी व प्रणव या दोघांनी कापडाची झोळी करुन त्यांना कार्यालयाबाहेर आणले. तेवढ्यात रुग्णवाहिका आली होती. त्यातून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.”

--प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

चौकट

“नोटबंदी, जीएसटी आणि त्या पाठोपाठ लॉकडाऊन यामुळे सर्वच व्यापारी अडचणीत आले आहेत. असे असले तरी व्यापारी बांधवांनी असले कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा विचार करावा. व्यवसायात अडचण असेल तर बँकांशी आपल्या व्यवसायातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांशी बोलावे. त्यातून किमान मार्ग निघू शकेल. मात्र, आत्महत्येचा विचारही मनात आणू नये.”

-बाळासाहेब अमराळे, अध्यक्ष, व्यापारी सेल.

Web Title: Attempted suicide by a goldsmith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.