पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून...,पुणे पोलीस आयुक्तालयासमोरच एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 03:25 PM2022-05-27T15:25:10+5:302022-05-27T15:40:30+5:30
काही महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले होते
पुणे: काही महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले होते. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला. या प्रकरणाचा अहवाल अजूनही प्रलंबित असताना असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. एका तरुणाने पोलीस आयुक्तालयासमोरील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. परंतु नागरिकांनी आणि सतर्क झालेल्या पोलिसांनी या तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखले. धनाजी शिंदे (वय २३, रा. लातूर) असे या तरुणाचे नाव आहे. हा सर्व प्रकार होत असताना हा तरुण मद्यधुंद असल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धनाजी कोंढवा परिसरातील एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाकडे मागील काही महिन्यांपासून काम करतो. मागील दोन महिन्यांपासून त्याला पगार दिला नव्हता. धनाजी याचे वडील आजारी असल्यामुळे त्याला पैशाची गरज होती. त्याने आपल्या मालकाकडे पैशाची मागणी देखील केली होती. परंतु मालक काही पैसे देत नव्हता. काम करूनही पैसे मिळत नसल्यामुळे तो वैतागला होता. त्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत सांगण्याचाही प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी योग्य ती दखल न घेतल्याने तो नैराश्यात गेला होता.
याच नैराश्यातून तो गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर गेला. तत्पूर्वी त्याने मद्यप्राशन केले. पोलीस आयुक्तालयाच्या तीन नंबरच्या प्रवेशद्वारासमोरील झाडावर चढून तो गळफास घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु तेथील नागरिक आणि पोलिसांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवले. त्याची माहिती घेतली अन् न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत स्वारगेट पोलीस ठाण्यात पाठवले.
काही महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. चारित्र्य पडताळणी प्रमाणात मिळवताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी तेव्हा खडकी पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन देखील करण्यात आले होते.