Pune Porsche Car Accident:डॉक्टर, पोलिस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय; नाना पटोलेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 09:40 AM2024-05-30T09:40:14+5:302024-05-30T09:40:41+5:30
डॉ. तावरे याने मी सर्वांची नावे उघड करणार, असे सांगितल्याने त्याच्या जिवाला धोका निर्माण झालाय
Pune Porsche Car Accident: पोर्शे कार अपघात प्रकरणात सरकार लपवाछपवी करून स्वत:च्या बगलबच्चांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत टिळक भवनमधील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना केला. रक्ताच्या नमुन्याच्या चाचणी अहवालात बदल केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली एसआयटी समिती म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
पटोले म्हणाले की, एसआयटी समितीच्या अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मिरज हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी कोरोना काळात अनेक गैरप्रकार केले. ते सर्वांना माहिती आहेत. त्यांच्याकडे सरकारी वाहन नाही, त्या सरकारच्या पैशाने भाडेतत्त्वावर वाहन वापरतात. त्याचे दरमहा भाडे लाखात आहे. असा भ्रष्ट अधिकारी पुण्यातील रक्त नमुना बदलाच्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे कशी करू शकतो? त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
"मी सर्वांचीच नावे घेणार..." रक्ताचे नमुने बदलणारा डाॅ. अजय तावरेचा इशारा, आणखी मासे गळाला लागणार?
या अपघात प्रकरणात डॉक्टर, पोलिस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचे कारण हे सगळेच कोणाशी तरी संबंधित आहेत, याचा पुनरुच्चारही पटोले यांनी केला. अपघात प्रकरणात कोणत्या मंत्र्याने फोन केले? अपघात झाला त्यावेळी त्या गाडीत आणखी कोण कोण होते? पबमधून मुले निघाली त्यावेळी दोन गाड्या होत्या, त्यांनी गाड्यांची रेस लावली होती आणि त्यातूनच हा अपघात झाला, असेही पटोले म्हणाले.
राज्य सरकारने या सर्व गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. रक्त नमुन्याचा चाचणी अहवाल बदलण्याच्या आरोपावरून अटक झालेल्या डॉ. तावरे याने मी सर्वांची नावे उघड करणार, असे सांगितल्याने त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने डॉ. तावरे याला सुरक्षा द्यायला हवी. तो या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आहे, असेही पटोले म्हणाले.