केंद्राकडून सहकार अडचणीत आणण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:43+5:302021-02-23T04:14:43+5:30
पुणे : केंद्र शासनाकडून विविध कायदे करून ‘सहकार’ अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, लोकांचा अद्यापही सहकार क्षेत्रावर विश्वास ...
पुणे : केंद्र शासनाकडून विविध कायदे करून ‘सहकार’ अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, लोकांचा अद्यापही सहकार क्षेत्रावर विश्वास आहे. देशातील सहकारी क्षेत्रामध्ये सुमारे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बँकांमध्ये असल्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार पार पडली. या वेळी वळसे-पाटील बोलत होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उपाध्यक्ष अर्चना घारे, आमदार दिलीप मोहिते, यशवंत माने, ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के, रेवणनाथ दारवटकर, निवृत्ती गवारी, आत्माराम कलाटे, संजय काळे, पोपटराव गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात होते.
वळसे-पाटील म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफी योजना घोषित केली आहे. यासोबतच वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे.
थोरात यांनी बँकेला गेल्या आर्थिक वर्षामध्ये २७३ कोटी २३ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचे सांगितले. नफा वाटणीमध्ये तरतुदी करूनदेखील निव्वळ नफा ५० कोटी २३ लाख रुपये झाला आहे. पगारदार व्यक्ती बँक सेवक आणि विविध कार्यकारी सोसायट्यांचे सचिव यांच्या कॅश क्रेडिटमध्ये वाढ करण्यात आली आहे. बँकेने खरीप आणि रब्बी हंगाम मिळून आजपर्यंत २ हजार २१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. गेल्या मार्च अखेर बँकेची एकूण उलाढाल १७ हजार ४१ कोटी रुपयांवर गेली असून बँकेकडील १० हजार १९२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नेट एनपीए चे प्रमाण शून्य टक्के असल्याची माहिती थोरात यांनी दिली.
या वेळी जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांचा गौरव मानाची ढाल देऊन करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी अहवाल वाचन केले. सर्वसाधारण सभेत अकरा विषयांना एकमताने मान्यता देण्यात आली.