राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न : चेतन तुपे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 08:38 PM2019-08-13T20:38:09+5:302019-08-13T20:38:31+5:30
ज्यांना पक्षाची विचारधारा माहिती नाही, ज्यांना समाजातील जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करायची आहे त्यांनी हे उद्योग केले आहेत. .
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हा सर्वधर्मसमभाव व फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा माननारा पक्ष आहे. हा केवळ मराठ्यांचा पक्ष आहे अशा स्वरुपाचे पत्र पाठवणे हा पक्षाला बदनाम करण्याचा डाव आहे. यातील आरोप निराधार व खोडसाळपणाचे असल्याचे स्पष्टीकरण शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले.
पक्षाची भूमिका नेहमीच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याची राहिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्वच नेते व पदाधिकारी जातीपाती पलिकडे जाऊन राजकारणाकडे पाहतात. दलित, ओबीसी, मुस्लिम व अल्पसंख्यांकांच्या हितासाठी नेहमीच त्यांना पक्षाने प्रतिनिधीत्व दिले आहे.
शहरामध्ये पालिकेत एकच स्विकृत नगरसेवकपद वाट्याला आले होते. हे पद सुभाष जगताप यांना दिले. तर राज्याच्या महिलाध्यक्षा रुपाली चाकणकर ओबीसी आहेत. सांस्कृतिक कला सेलचे बाबा पाटील ओबीसी आहेत. अमोल कोल्हे खासदार झाले ते ओबीसी आहेत. सत्ता असताना पालिकेच्या महापौर व स्थायी समिती अध्यक्षपदी ओबीसी महिलेला संधी दिली होती. यासोबतच पक्षाचे २१ सेल आहेत. या सेलमध्ये ८ सेलचे अध्यक्ष मराठा व १३ सेलचे अध्यक्ष मराठेतर आहेत. शहराच्या मुख्य संघटनेतील १३० पदांपैकी ७७ पदे ही मराठेतर व्यक्तींना दिलेली आहेत. हे प्रमाण ५९ टक्के असल्याचे तुपे म्हणाले.
पक्ष फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा मानतो. ज्यांना पक्षाची विचारधारा माहिती नाही, ज्यांना समाजातील जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करायची आहे त्यांनी हे उद्योग केले आहेत. अद्यापही शरद पवार अजित पवार, जयंत पाटील, अॅड. वंदना चव्हाण यांच्यापासून ते माझ्यापर्यंत कोणालाही या पत्राची प्रत मिळालेली नाही. पक्षामध्ये लोकशाही असून सर्वांच्या मतांना किंमत आहे. केवळ सोशल मीडियामधून फिरत असलेल्या या पत्राला कोणतेही महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचे तुपे म्हणाले.
====
अजित पवार यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून मराठेतर समाजातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांना अत्यंत महत्वाची पदे दिलेली आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून मराठा समाज अधिक सक्रिय असल्याने त्यांना संधी मिळते यात वावगे नाही. पक्षाच्या विविध सेलच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षपदीही अन्य समाजातील कार्यकर्ते होते. २०१४ साली पर्वती विधानसभा खुल्या गटासाठी असतानाही दलित समाजातील उमेदवाराला संधी दिली. राष्ट्रवादीविरोधातील हे पत्र महत्वहीन असून पक्षाला बदनाम करण्यासाठी असल्याचे पत्र दादा ग्रुपच्यावतीने जितेंद्र टकले, शैलेश बडदे, उद्धव बडदे, गणेश माथवड, संदीप तौर, बाळासाहेब अटल, गोविंद थरकुडे आदींनी प्रसिध्दीस दिले आहे.