माजी सरन्यायाधीशांकडून न्याय व्यवस्थेमधील सत्य सांगण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:51+5:302021-02-15T04:10:51+5:30
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेले विधान अत्यंत धक्कादायक असून सद्यस्थितीतील न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा ...
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेले विधान अत्यंत धक्कादायक असून सद्यस्थितीतील न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा हा प्रयत्न तर नाही ना हे मला ठाऊक नाही. परंतु, या विधानामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुण्यात सुरू असलेल्या ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ‘देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाल्याचे तसेच न्यायालयात न्याय मिळत नसल्याचे वक्तव्य केले आहे. न्यायालयात तुमचेच मळलेले कपडे धूत बसावे लागते. त्यामुळे तेथे न्याय मिळत नाही असेही त्यांनी नमूद केले होते. गोगोई यांच्या विधानामुळे न्याय व्यवस्थेवरील चर्चेला तोंड फुटले आहे. याविषयी पवार यांना विचारले असता त्यांनी नागरिकांच्या मनात चिंता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली.
यासोबतच, राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण तसेच मंत्री धनंजय मुंडे लैंगिक अत्याचार तक्रार प्रकरणी शरद पवार गप्प का आहेत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. याविषयी पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांना आपले गाव सोडून बाहेर दुसरीकडे जावे लागते अशा लोकांबद्दल मी बोलायचे का? त्यांच्याबद्दल मी काय बोलणार असे म्हणत पाटलांना चिमटा काढला.