फरार असताना मालमत्ता विकण्याचा मोतेवारांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:11 AM2018-07-02T00:11:29+5:302018-07-02T00:11:42+5:30
ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार यांनी फरार असताना विविध मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आहे.
पुणे : ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार यांनी फरार असताना विविध मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आहे. तपासासाठी त्यांना विशेष न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
वैशाली मोतेवार यांना न्यायालयाने २०१६ मध्ये फरारही घोषित केले होते. राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पथकाने त्यांना शनिवारी अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. वैशाली या समृद्ध जीवन फुड्स इं. लि. या कंपनीच्या आॅक्टोबर २००९ पासून संचालक होत्या. २०१३ मध्ये कंपनीच्या त्या दुसऱ्या क्रमांकाच्या शेअरधारक आहेत. त्यांच्या नावावर १७ हजार शेअर्स असून हा वाटा एकूण १७.८९ टक्के आहे. कंपनीने ३ हजार ५०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. संचालक म्हणून कार्यरत असल्यामुळे अपहार केलेल्या पैशांबाबत वैशाली यांच्याकडे तपास करायचा आहे. फरार कालावधीत त्यांनी मालमत्ता विक्रीचाही प्रयत्न केला आहे. महेश मोतेवार यांनी मुलगा अभिषेक याला पॉवर आॅफ अॅटर्नीचे अधिकार दिले असून आतापर्यंत किती मालमत्तांची विल्हेवाट लावली याचा तपास करायचा आहे. वैशाली यांच्यावर ८ राज्यांमध्ये २६ गुन्हे दाखल आहेत. तपास करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी १४ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली.
१२ कंपन्यांमध्ये वळवला पैसा
प्रजा विचार मास मीडिया लि., समृद्ध जीवन ट्रेडिंग अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग, जीवन ज्योती कन्स्ट्रक्शन्स, न्यूट्रीलॉन मिल्क अॅण्ड मिल्क प्रा. लि., आॅर्चिड रिसोर्ट प्रा. लि., सुवर्णा मुद्रा अॅण्ड हॉटेल्स, स्ट्रान्स हॉटेल्स अॅण्ड हॉस्पिलिटी, सुवर्णमुद्रा हॉस्पिलिटी, समृद्ध जीवन फिनविस्ट लि., टेकमाइंड इन्फोटेक प्रा. लि., टॅक्ससाईट टेलेटेक प्रा. लि. आणि अलेगन्स इंटरटेनमेंट प्रा. लि. अशा १२ कंपन्यांमध्ये वैशाली मोतेवार संचालक होत्या. या सर्व कंपन्यांना समृद्ध जीवनमधून पैसा वळता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
पगारापोटी १ कोटी १० लाख दिले : कंपनीच्या मिळालेल्या अहवालानुसार वैशाली यांना पगार स्वरूपात १ कोटी १० लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच १७ कोटी ८८ लाखांची अतिरिक्त रक्कमही देण्यात आल्याचे उघड झाले आहे.