कोकणात हजेरी अन् मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:14+5:302021-06-28T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा असून विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात सोलापूर १००, माढा ७०, मोहोळ, पंढरपूर ६०, गगनबावडा ५०, मंगळवेढा ४०, महाबळेश्वर, पाथर्डी ३० मिमी पाऊस पडला होता.
मराठवाड्यातील हिंगोली ५०, उस्मानाबाद ४०, मुदखेड ३०, अंबड, औंढा नागनाथ, बदनापूर, कळमनुरी, पारंडा, रेणापूर, वसमत, वडावणे २० मिमी पाऊस झाला होता. विदर्भातील गौंड पिपरी ४०, वरोरा ३०, भद्रावती, चिमूर, दिग्रस, कोरघना, मंगळुरपीर, मौदा मोहाडी, मूलचेरा, समुद्रपूर, वणी २० मिमी पाऊस पडला होता. घाटमाथ्यावरील भिवपूरी २००, अम्बोणे ९०, ताम्हिणी, काेयना (नवजा) ५०, शिरगाव ४० मिमी पावसाची नोंद झाली होती.
रविवारी दिवसभरात कोकणातच साधारण सर्वत्र पाऊस पडत असल्याचे दिसून आले. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई २४, सातांक्रूझ १९, अलिबाग १९, रत्नागिरी ३, पणजी ३, डहाणु ३७, महाबळेश्वर ७, वर्धा १३, बुलढाणा २, चंद्रपूर २, नागपूर ३, सोलापूर ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील ४ दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
..........
धुळे, अकोला, नंदूरबारमध्ये दुष्काळ सदृश स्थिती
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला असला, तरी आता पावसाने ओढ दिली आहे. धुळे येथे १ ते २३ जून दरम्यान सरासरीच्या तुलनेत ४८ टक्के कमी पाऊस झाला आहे. नंदूरबारमध्ये -४१ टक्के, अकोला येथे -४८ टक्के कमी पाऊस पडला आहे. त्याचबरोबर जळगाव -१५ टक्के, सोलापूर -१७ टक्के, बुलढाणा -१२ टक्के, अहमदनगर -६ टक्के कमी पाऊस झाला आहे.