मानसिकता बदलल्याने वाढेल शाळांमधील उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:16+5:302020-12-24T04:12:16+5:30
पुणे : कोरोनानंतर शाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला असून पालक व विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत हळूहळू बदल होत आहे. ...
पुणे : कोरोनानंतर शाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला असून पालक व विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत हळूहळू बदल होत आहे. तसेच शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती वाढीसाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाबत निर्माण झालेल्या पालकांच्या मानसिकतेत बदल झाल्यानंतर आपोआपच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढेल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.
कोरोनानंतर बंद असलेल्या शाळा सुरू होऊन बुधवारी (दि.२३)एक महिना पूर्ण झाला. शिक्षण विभागातर्फे नियमितपणे शाळांमधील उपस्थितीचा आढावा घेतला जात आहे. त्यात राज्यातील शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती सरासरी सुमारे २० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. याबाबत साळुंके म्हणाले, विद्यार्थी उपस्थिती वाढवण्याची शिक्षण विभागाकडून कोणतीही घाई केली जात नाही. कोरोनाबाबतची सध्य स्थिती, संभाव्य दुसरी लाट आणि ब्रिटन मध्ये निर्माण झालेल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन उर्वरित वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनस्थरावर घेतला जाणार आहे. विद्यार्थी व पालकांची मानसिकता बदलल्यानंतर आपोआपलच शाळांमधील उपस्थिती वाढेल.
प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप म्हणाले,विद्यार्थी उपस्थितीत हळूहळू वाढ होत चालली असून उपस्थिती २० टक्क्याहून अधिक आहे. पुढील काळात त्यात आणखी वाढ होईल.