बेघरांकडे पालिका देणार लक्ष
By admin | Published: July 10, 2016 04:47 AM2016-07-10T04:47:42+5:302016-07-10T04:47:42+5:30
रात्री-अपरात्री शहरात आलेल्या नागरिकांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या रात्र निवारे (नाईट शेल्टर) ची जनजागृती करण्यात येणार आहे.
पुणे : रात्री-अपरात्री शहरात आलेल्या नागरिकांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या रात्र निवारे (नाईट शेल्टर) ची जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय सध्या सुरू असलेल्या शेल्टरमध्येच महिलांनाही प्रवेश देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच बाहेरगावाहून येणारे नागरिक शहरात ज्या ठिकाणी उतरतात अशा परिसरातच हे रात्र निवारे उभारण्यासाठी प्राधान्य देऊन अशा जागांची लवकरच पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य समाजविकास अधिकारी गणेश सोनूने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रात्र निवाऱ्यांची स्थिती, निवारे सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच निवारे असूनही त्याबाबत होत नसलेल्या जनजागृतीमुळे बेघरांसाठी असलेली ही सुविधा चांगली असली तरी, त्याचा फायदा होत नसल्याची बाब ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे समोर आणली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
शहरात रात्री-अपरात्री येणाऱ्या बेघरांना राहण्यासाठी व्यवस्था व्हावी या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने देशातील मोठ्या शहरांनी रात्र निवारे (नाईट शेल्टर) सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने शहरात चार ठिकाणी ही शेल्टर उभारली आहेत. मात्र, त्याची माहिती स्थानिक परिसरातील नागरिकांनाही नाही. त्यामुळे या प्रकल्पांची माहिती लवकरच स्वारगेट, शिवाजीनगर , पुणे स्टेशन बसस्थानकांसह शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहे.
या माहितीमध्ये शेल्टरचा पत्ता, त्यासाठी असलेले नियम, तसेच शेल्टरकडे जाण्यासाठीचा नकाशाही लावण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात रात्री या ठिकाणी आलेल्या नागरिकांना तातडीने निवासासाठीची सोय कोठे उपलब्ध आहे, याची माहितीही मिळणार असून शेल्टरचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
महिलांसाठीही उघडणार दारे
- महापालिकेकडून शहरात येरवडा, बोपोडी, पुणे स्टेशन तसेच सेनादत्त पोलीस चौकीच्या परिसरात हे शेल्टर उभारले आहेत. त्यातील सेनादत्त, तसेच येरवडा येथेच महिलांसाठी जागा आहे. मात्र, पुणे स्टेशन येथे अनेकदा कुटुंबेच येत असल्याने महिलांसाठी जागा नसल्यास पुरुषही त्या ठिकाणी राहत नाहीत.
त्यामुळे उर्वरित दोन्ही ठिकाणी महिलांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सोनूने यांनी स्पष्ट केले, तर यापुढील निवारे हे शहरात नागरिक ज्या ठिकाणी बस, रेल्वे अथवा खासगी वाहनांनी शहरात उतरतात अशा ठिकाणी निश्चित करून या जागांच्या नजीकच्या परिसरातच शेल्टर उभारली जाणार असून त्यासाठीचे सर्वेक्षणही लवकरच करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.