सराफांकडील उलाढालीवर लक्ष
By admin | Published: November 17, 2016 04:39 AM2016-11-17T04:39:46+5:302016-11-17T04:39:46+5:30
विधान परिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे.
पुणे : विधान परिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे. या निवडणुकीत नोटाबंदीमुळे पैशाऐवजी सोनेवाटपाची शक्यता अधिक असल्याने सराफांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत सोने व्यापारी यांच्याकडूनही गैरव्यवहार होऊ नये, अशा सूचना सराफ असोसिएनच्या पदाधिकारी यांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीत ते बोलत होते. या वेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.
राव म्हणाले, ‘‘संबंधित उमेदवार व त्यांच्या पक्षातर्फे केल्या जाणाऱ्या रोख रकमांचा मोठा आर्थिक व्यवहारावर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयकर, विक्रीकर आदी संबंधित विभागांनी विशेष लक्ष ठेवावे. निवडणुकीत गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून अधिक पारदर्शकपणे निवडणूक व्हावी. निवडणुकीच्यादरम्यान नियमबाह्य होर्र्डिंग्ज, बॅनरद्वारे राजकीय स्वरूपाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. बँकामार्फत होणाऱ्या मोठ्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराबाबत सतर्क राहावे.
भरारी पथके, दक्षता पथके यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिवाकर देशमुख, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड (शहर) देवेंद्र कटके (ग्रामीण), पिंपरी-चिंचवड मनपाचे अधिकारी, ज्वेलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)