‘वृत्ती’ आणि ‘निवृत्ती’च्या घोळात ढेपाळली खाकी
By Admin | Published: March 1, 2016 01:44 AM2016-03-01T01:44:46+5:302016-03-01T01:44:46+5:30
पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना लागलेले निवृत्तीचे वेध आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांची ‘दीर्घ रजा’ यामुळे सध्या पोलीस दलाला एकप्रकारची मरगळ आली आहे.
पुणे : पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना लागलेले निवृत्तीचे वेध आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांची ‘दीर्घ रजा’ यामुळे सध्या पोलीस दलाला एकप्रकारची मरगळ आली आहे. त्यातच अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त असलेल्या तीन पदांचा अतिरिक्त ‘चार्ज’ सी. एच. वाकडेंकडे आहे. आयुक्त पाठक यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे सह आयुक्त रामानंद नाराज होऊन रजेवर गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
गेल्या चार दिवसांत महिला आणि तरुणींवरच्या बलात्काराच्या गंभीर घटना घडल्या आहेत. सोबतच गेल्या आठवड्यात कर्वे रस्त्यावरच्या दशभुजा मंडळाच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अध्यक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री- बेरात्री होणाऱ्या वाटमाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. तर अनेक वर्षांपासूनचे वाहनचोरी, दरोडे आणि खुनांचे अनेक गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत. पुणे शहर आयुक्तालयाची धुरा सध्या पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे सांभाळत आहेत. पोलीस आयुक्त मार्चअखेरीस निवृत्त होत असल्यामुळे त्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. आयुक्तालयामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची दक्षिण विभाग, उत्तर विभाग, गुन्हे शाखा आणि प्रशासन अशी चार पदे आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त प्रकाश मुत्याळ आणि पी. एन. रासकर यांची बदली झाली. त्या वेळीही दक्षिण विभागाचे पद रिक्तच होते. सध्या या चारही पदांचा पदभार वाकडेंकडे आहे. त्यातच भर म्हणून की काय सह आयुक्त रामानंद सुटीवर गेल्यामुळे त्यांचाही पदभार वाकडे यांच्याकडेच देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. सह पोलीस आयुक्तांनी घेतलेली लांबलचक सुटी त्याचीच परिणती असल्याचेही आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्तांनी घेतलेले काही निर्णय रामानंद यांना पटले नाहीत. किंबहुना त्यांचे मत विचारात घेतले गेले नाही अशीही चर्चा आयुक्तालयामध्ये आहे. आयुक्तांची बढतीवर बदली अपेक्षित असल्यामुळे रामानंद थेट
नवीन आयुक्त आल्यावरच ‘हजर’ होणार अशीही अटकळ बांधण्यात
येत आहे.
पोलीस आयुक्तांची बदली होणार असल्यामुळे कामापेक्षा नवीन पोलीस आयुक्त कोण येणार, याचाच अधिकाऱ्यांमध्ये अधिक खल
रंगत आहे.
बदलीला थोडाच अवधी शिल्लक असल्यामुळे आयुक्त ‘शांत’ आहेत, तर खात्यामध्ये ‘नॉन करप्ट’ अशी ओळख आणि दरारा असलेले रामानंद मोठ्या सुटीवर आहेत. त्यामुळे सध्या तरी पुणे पोलीस
दल सुस्तावल्याची प्रतिक्रिया पुणेकरांमधून उमटत आहे.