कासारवाडी पुलाचे आकर्षण कायम
By Admin | Published: February 15, 2015 12:03 AM2015-02-15T00:03:02+5:302015-02-15T00:03:02+5:30
शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कासारवाडीतील भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डानपुलास रविवारी एक वर्ष पुर्ण होत आहे.
पिंपरी : शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कासारवाडीतील भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डानपुलास रविवारी एक वर्ष पुर्ण होत आहे. वर्ष उलटूनही या भल्या मोठ्या पुलाची आकर्षण अद्याप टिकून आहे. अद्यापही पुलाच्या परिसरात छायाचित्रे टिपताना नागरिक दृष्टिस पडतात. आल्हादायक वातावणाचा आनंद लुटण्यासाठी पुलावर सायंकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. चित्ताकर्षक पुलाचे विविध छायाचित्रे सोशल साईटवर लाईक्स मिळवत आहेत.
सर्वात उंच आणि सर्वांत भव्य असा हा पुल उद्योगनगरीतील आगळेवेगळे वैशिष्टये ठरले आहे. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेल्या हा वैशिष्टयपूर्ण पुल नागरिकांचे आकर्षक ठरले आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत १३० कोटीपेक्षा अधिक रुपये खर्च करुन हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पुल तयार झाला. गेल्या वर्षी १५ फेब्रुवारीला हा पुल वाहतूकीस खुला झाला.
रेल्वेमार्ग, पवना नदी, पुणे- मुंबई महामार्ग ओलांडणारा हा दुमजली पुल राज्यातील पहिल्याच असल्याचे महापालिकेचा दावा आहे. कासारवाडीहून भोसरीकडे जाणारा एकेरी मार्गाचा पुल आहे. या वरच्या पुलाची लांबी १.१ किलोमीटर आहे. तर, दुसरा पिंपळे गुरवहून भोसरीकडे जाणारा खालचा पुल आहे. त्याची लांबी ७०० मीटर आहे. या मार्गावर बीआरटीएसचा स्वतंत्र तयार केला आहे. तसेच, पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी पदपथ आहे.
पुलामुळे पुणे- मुंबई आणि पुणे- नाशिक महामार्गाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. नाशिक फाटा चौकात वारंवार होणारी कोंडी सुटली आहे. निळा व पिवळा रंंगाच्या प्रकाशझोतात पुल संध्याकाळनंतर उजळून निघतो. आजूबाजूच्या इमारती, वाहणारी पवना नदी, पुणे व लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या, पुणे- मुंबई महामार्ग, सीएमईचा मोकळा परिसर, एमआयडीसी आदी भाग पाहताना नागरिक हरखून जातात. फेरफटका मारण्यासाठी नागरिक सहकुटुंब संध्याकाळी पुलावर गर्दी करत आहेत. ती मध्यरात्रीपर्यत कायम असते. सुट्टीच्या काळात त्यात वाढ होते. गप्पा मारत बसलेले नागरिक, खेळत असलेली मुले असे चित्र येथे नेहमी पाहावयास मिळते. बीआरटीएस बस मार्ग बंद असल्याने तेथे निवांत बसून गप्पाची मैफल रंगते. मध्यरात्री वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेकाचे ग्रुप येथे आवर्जुन येतात. भव्य पुल आणि आजूबाजूच्या उंच उंच इमारती, हिवरळ असल्याने परदेशातील एकाद्या स्मार्ट सिटीचा भास होतो.
नागरिक मोबाईल व कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे टिपतात. वेगवेगळ्या कोनातून पुलाची छायाचित्रे टिपली जातात. प्रवासी नागरिक भव्य पुल पाहून ते हरखून जातात. पुलाची छबी टिपण्यासाठी त्याचे मोबाईल क्लिक होतात.
पहाटे व सकाळी वार्कीग व व्यायाम करण्यासाठी येथे पसंती दिली जाते.हा अनोखा पुल पाहण्यासाठी इतर भागांतील नागरिक पुलास भेट देतात. काही वेळ पुलावर थांबून शहराचे नव्या रुपाचे दर्शन घेतात. पुलाची असंख्य छायाचित्रे सोशल साईटवर अजूनही लाइक्स मिळवीत आहेत. (प्रतिनिधी)
४रस्त्यापासून पुलाची उंची २१ मीटर आहे. पुलाचे काम ३० महिन्यात पुर्ण केले गेले. वरच्या पुलाची लांबी १.१ किलोमीटर अंतर आहे. खालच्या पुलाची लांबी ७०० मीटर आहे. पुलास एकूण खर्च १३० कोटीपेक्षा अधिक झाला आहे. यासाठी जागतिक बॅँकेचे कर्ज घेण्यात आले आहे.
बीआरटी मार्ग अद्याप बंद :
४पुलास एक वर्ष पुर्ण झाला असला तरी, अद्याप तेथील बीआरटी बस मार्ग सुरू झालेला नाही. तसेच, पिंपळे गुरवहून नाशिक फाटा चौकात उतरण्यासाठी तयार असलेला रॅम्प वाहतूकीस खुला केलेला नाही.