आळंदीत श्रावणी सोमवारनिमित्त माऊलींच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 08:30 PM2021-09-06T20:30:25+5:302021-09-06T20:36:34+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने हजारो भाविकांनी महाद्वारातून माऊलींचे व सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.
शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीत शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने हजारो भाविकांनी महाद्वारातून माऊलींचे व सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.
वडगाव - घेनंद (ता.खेड) वनपरिक्षेत्रातील पांडवकालीन महादेव मंदिर अर्थातच तीर्थक्षेत्र बेली येथे श्रावणातील शेवटच्या सोमवार निमित्त शेकडो भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून महादेवाचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. तत्पूर्वी, तीर्थक्षेत्र बेली येथे श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी मंदिरातील शिवलिंगाला रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे शिवलिंग फुलांच्या सजावटीत फुलून दिसत होते.
खेड तालुक्यातील आळंदीलगत असलेल्या वडगाव - घेनंद गावच्या पश्चिमेला वनपरिक्षेत्रातील घनदाट झाडीत स्वंयभु शिवलिंग आहे. विशेष म्हणजे हे स्वंयभु शिवलिंग पांडवकालीन असून पौराणिक वारसा लाभलेले स्थळ आहे. अनेक वर्षे साध्या मंदिरात शिवलिंगाची पूजा अर्चा केली जात होती. कालांतराने महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचे सुशोभिकरण केले आहे. सद्य स्थितीत घनदाट झाडीत वसलेले हे पुरातन मंदिर भाविकांना खुणावत आहे.
दरम्यान, अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त शेकडो भाविकांनी तीर्थक्षेत्र बेली येथील महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी नियमांचे पालन करून केळी व दुधाचे प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आले.