संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 03:18 PM2023-06-07T15:18:51+5:302023-06-07T15:19:08+5:30
पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले
रांजणगाव गणपती: संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच आज संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट अयोजनाने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो भाविकांनी अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
अष्टविनायकामधील मानाचे स्थान असलेला महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी, उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने मंदीर परिसरात भाविकांसाठी मंडप करण्यात आला होता. इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.
संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता मुख्यविश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर , उपाध्यक्ष संदिप दौंडकर, खजिनदार विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी, चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर व देवस्थान कर्मचारी, तसेच आदी उपस्थित होते.