शरद पवारांच्या भेटीने अतुल बेनकेंची भावनिक कोंडी; माजी आमदार वल्लभ बेनकेंच्या प्रकृतीची केली विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 12:04 PM2023-10-04T12:04:47+5:302023-10-04T12:05:00+5:30
आमदार बेनके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष
नारायणगाव : राष्ट्रवादी काँगेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाचा नुकताच दौरा केला. दौऱ्यातून अनेकांना भविष्यातील इशारे मिळाले तर काहींना ब्रेक मिळवण्याची चर्चाही आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापासून अलिप्त होऊन तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी अचानकपणे शरद पवार यांनी जाऊन ज्येष्ठ नेते माजी आमदार वल्लभ बेनके यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यामुळे आमदार अतुल बेनकेंची भावनिक कोंडी केल्याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.
वल्लभ बेनके हे पवार यांच्यासोबत १९८५ पासून निष्ठावंत व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. सन १९८५ ते २०१४ पर्यंत सहा वेळा निवडणूक लढवून चार वेळा जुन्नर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या माजी आमदार वल्लभ बेनके हे काही वर्षापासून आजारी आहेत. त्यानंतर २०१९ मध्ये अतुल बेनके हे राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर जुन्नरचे आमदार झाले. नुकत्याच राजकीय घडामोडीमध्ये त्यांनी शरद पवार किवा अजित पवार यांच्या गटात सामील न होता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. सद्यस्थितीत अतुल बेनके हे अजित पवार गटात असल्याचे बोलले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात आमदार अशोक पवार यांना डावलले. मात्र अतुल बेनके यांना निधी देऊन शिंदे सरकारने स्थगित केलेली कामेही मार्गी लावली. त्यामुळे आ. अतुल बेनके हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.
जुन्नर येथे बिरसा ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शरद पवार हे त्यांचे एके काळाचे विश्वासू व निष्ठावंत सहकारी माजी आमदार वल्लभ बेनके यांची भेट घेण्यासाठी नारायणगाव येथे आले. त्यांचे स्वागत आमदार अतुल बेनके व युवा नेते अमित बेनके यांनी केले. पवार यांनी वल्लभ बेनके यांच्या तब्येतीची विचारपूस करीत राजश्री बेनके, आ.अतुल बेनके व अमित बेनके यांच्याशी संवाद साधला. जुन्या आठवणींना उजाळा देत विविध विषयांवर चर्चा केली. मात्र राजकीय चर्चा झाली की नाही याबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.
यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, आमदार सुनील भुसारा, प्रकाश म्हस्के, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, डॉ. सदानंद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
पवारांची खेळीने बेनकेंच्या भूमिकेकडे लक्ष्य
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. कधी कोणाचा गेम करायचा हे त्यांना चांगलच समजत. सध्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले तरी त्यांनी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा म्हणजे ते स्वत: असल्याचे जाहीर पत्रकार परिषदेतही सांगितले होते. त्यांनतर त्यांचा सुरु असलेला दौरा सर्व काही सांगत आहेत. पूर्वनियोजन नसतानाही अनेक कार्यकर्ते तसेच माजी आमदार वल्लभ बेनके यांची भेट हे आगामी राजकारणाचे संकेत देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अतुल बेनके यांना झुकते माप दिले आहे. ते निधीवाटपावरून समोर आले. पण खरी परीक्षा ही ६ ऑक्टोबरची आहे. यावेळी दोन्ही गटांना संख्या बळ दाखवावे लागणार आहे. शरद पवारांनी बेनकेंच्या निवासस्थानी भेट देत त्यांना अप्रत्यक्षपणे निर्णयावर आणून ठेवले आहे. त्यामुळे आता आमदार बेनके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.