शिरूरमध्येही भाजपला धक्का, अतुल देशमुखांनी फुंकली तुतारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:17 PM2024-04-11T17:17:54+5:302024-04-11T17:18:38+5:30
अतुल देशमुख यांचे तालुक्याच्या पश्चिम भागातील जिल्हा परिषद गटावरच नाही तर त्या भागासह तालुक्यावरही त्यांचे चांगले प्रभुत्व आहे
चाकण : भाजपचा खेड तालुक्यातील आक्रमक चेहरा असलेले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड-आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाला रविवारी (ता.७) रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली असून अतुल देशमुख हे शरद पवार गटात जाणार आहेत.
राज्य व देशात भाजपची सत्ता आहे. शिवाजी आढळराव पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना निधी दिला. आमदार दिलीप मोहितेंनाही मोठ्या प्रमाणात निधी दिला. परंतु, भाजपच्या माध्यमातून निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना व नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांना निधीपासून वंचित ठेवले. कामासाठी वरिष्ठांना भेटल्यानंतर टाळले गेले. यावरून खेड तालुक्यात वरिष्ठ नेत्यांना फक्त एका जिल्हा परिषद गटातच पक्ष वाढवायचा आहे. माझ्यासारख्या इतर कार्यकर्त्यांची नेत्यांना पक्षात गरज वाटत नाही. त्यामुळे प्राथमिक सदस्यत्वासह खेड आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख, भाजप पदाचा राजीनामा देत असल्याचे देशमुखांनी स्पष्ट केले. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मातब्बर नेते अतुल देशमुख यांची मोहितेंशी जानी दुश्मनी असल्याने ते अजित पवार राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते ते म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धवसेना. मात्र, त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणेच पसंत केले.
अतुल देशमुख यांचे तालुक्याच्या पश्चिम भागातील जिल्हा परिषद गटावरच नाही तर त्या भागासह तालुक्यावरही त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केलेले आहे. गतवेळची आमदारकीची निवडणूक अपक्ष लढवित त्यांनी ५५ हजार मते घेतली होती. त्यांना मानणारे तरुण कार्यकर्ते गावागावात आहेत. त्यांच्यासह त्यांनी भाजप सोडल्याने त्याचा पहिला फटका पक्षाला या लोकसभा निवडणुकीतच बसणार आहे. नंतर तो विधानसभा, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीतही दिसणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.