कॅप्टन होण्याचे अतुलचे स्वप्न राहिले अपूर्ण
By admin | Published: March 19, 2016 02:38 AM2016-03-19T02:38:37+5:302016-03-19T02:38:37+5:30
बोरकरवाडी (ता. बारामती) येथील तरुणाचा विदेशात (ओमेन) रसायनयुक्त द्रव्याच्या जहाजावर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने मृृत्यू झाला. अतुल प्रकाश बोरकर (वय २३) असे त्याचे नाव आहे.
सुपे : बोरकरवाडी (ता. बारामती) येथील तरुणाचा विदेशात (ओमेन) रसायनयुक्त द्रव्याच्या जहाजावर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने मृृत्यू झाला. अतुल प्रकाश बोरकर (वय २३) असे त्याचे नाव आहे. मागील आठवड्यात जहाजाने पेट घेतल्याने अतुल भाजून जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी (दि. १३) मृत्यू झाला अन् कॅप्टन होण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. आज त्याच्यावर हजारोच्या संख्येच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बोरकरवाडी येथील अतुल बोरकर याला जहाजावर काम करण्याची आवड होती. त्यातून अतुलने चेन्नई येथे दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला होता. मागील एक वर्षापासून तो येमेन देशात जहाजावर काम करीत होता. मागील सप्टेंबर महिन्यात तो सुट्टीवर घरी आला होता. त्याच महिन्यात तो परत गेला. ३ मार्चला त्याने घरी फोन केला होता. या वेळी सर्व खुशाल असल्याची माहिती त्याच्या थोरल्या भावास दिली होती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी ४ मार्चला (शुक्रवारी) केमिकल वाहतूक करणाऱ्या जहाजाचा स्फोट झाला. त्यामध्ये अतुल गंभीर जखमी झाला होता.
याबाबतची माहिती जहाजाचे कॅप्टन हर्षद बिलाल यांनी फोनवरून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरूअसतानाच रविवारी (दि. १३) निधन झाले. त्यानंतर त्याचे पार्थिव ओमेनवरून मुंबई येथे आणण्यात आले. त्यानंतर मुंबईवरून बोरकरवाडीत शुक्रवारी (दि.१८) आज दुपारी साडेतीनला आणल्यावर अंत्यविधी करण्यात आला. या वेळी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याच्यावर शोकाकुल वातवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी दिलीप खैरे, करण खलाटे, संभाजी होळकर उपस्थित होते.
दरम्यान, पार्थिव आणण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय संरक्षण मंत्रालय, माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदींचे सहकार्य मिळाले. सांताक्रुझ येथील विमानतळावर पार्थिव आले. या वेळी अखिल भारतीय मर्चन्ट नेव्ही युनियनचे अध्यक्ष नरेंद्र शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. (वार्ताहर)